कथ्थक नृत्याची राणी साठ्यांची मनीषाराणी

विद्यापीठाच्या पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठी त्या मार्गदर्शकही आहेत. हाही मान सर्व कलावंतांना मिळतोच असं नाही. त्या पुणे विद्यापीठातल्या ललित कला अकादमीमध्ये तर शिकवायला जातातच पण त्याचबरोबर पुण्यातल्याच भारती विद्यापीठामधल्या कलाकेंद्रातही शिकवतात. जे आपल्या जवळ आहे ते इतरांना वाटून टाकणं म्हणजे शिकवणं या भूमिकेतून त्या एक उत्तम कलाकार आणि तितक्‍याच उत्तम गुरू आहेत. पुणेकरांनाच काय पण साऱ्या भारतीयांना त्यांचा अभिमान आहे.

पुणं म्हणजे या महाराष्ट्र राज्याच्या नव्हे, तर खरं म्हणजे देशाच्या सांस्कृतिक राजधानीत काय नाही! सारं काही आहे. एका बाजूला सांस्कृतिक पुण्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जाणारं महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्यासारखं ऐतिहासिक व्यक्‍तिमत्त्व आहे, तर दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक पुण्याचं नाव अटकेपार नेणाऱ्या डॉ. सुचेता भिडे-चापेकर आणि मनीषा साठे यांच्यासारख्या अनुक्रमे भरत नाट्यम्‌ आणि कथक नृत्याची पताका फडकवत ठेवणाऱ्या नृत्यांगना आहेत. (डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांच्याबद्दल वेगळा लेख लिहावा लागेल आणि तो लिहिला जाईलच) परंतु आजच्या लेखात नृत्य अप्सरा-नृत्यांगना मनीषा साठे यांच्याबद्दल लिहिताना केवळ त्यांच्याच कारकिर्दीचा एक नृत्यांगना आणि माणूस म्हणून विचार केला जाणार आहे. (अप्सरा आली… हे गाणं रचताना कदाचित मनीषा साठेच गीतकाराच्या नजरेसमोर असाव्यात) मनीषा साठे या केवळ पुण्याचंच नव्हे, केवळ महाराष्ट्राचंच नव्हे, तर आपल्या भारत या देशाचं भूषण आहेत. एखाद्या कलेच्या सेवेसाठी सर्वस्व पणाला लावून “कथक नृत्याची राणी’ अशी अनभिषिक्त पदवी प्राप्त करणारी ही नृत्यांगना.

माझा जावई संदीप कश्‍यप हा चित्रपट दिग्दर्शक आणि जाहिरात क्षेत्रात नावलौकिक असणारा एक तंत्रज्ञ आहे. मनीषाताईंनी आपल्या अमेरिकेत राहणाऱ्या कन्या शांभवी वझे यांच्या नृत्याविष्कारावर आधारित पुण्यात त्यांचं एक व्हिडिओ शूटिंग करून घेतलं. त्याची सारी निर्मितीविषयीची जबाबदारी मनीषाताई स्वतः जातीनं बघत होत्या. मांडणी आणि मांडामांडी करण्याचे काम त्यांनी संदीप कश्‍यप यांच्यावरच सोपवले होते. त्यावेळी आमचा जावई एक वाक्‍य सहज बोलून गेला. तो म्हणाला, “”बाबा “परफेक्‍शन’ असल्याखेरीज माणसं उगाचच मोठी होत नाहीत. होऊ शकत नाहीत.” हे वाक्‍य त्यांनं मनीषा साठे यांच्या एकंदर आयोजन, शिस्त आणि प्रत्येक गोष्ट साठे यांच्याबद्दल उच्चारलं होतं. घाऱ्या डोळ्यांच्या, साठे हे नाव सार्थ ठरवणाऱ्या सडपातळ बांध्याच्या, “देखण्या’ याच विशेषणानं शोभून दिसणाऱ्या मनीषा साठे या सुशिक्षित-सुसंस्कारीत-विदुषी हे नाव (विशेषण) आपल्याला शोभून दिसतं असा आत्मविश्‍वास असणाऱ्या मनीषाताई हसतमुखसुद्धा आहेत. त्यांची कन्या शांभवी वझे सध्या अमेरिकेत वास्तव्याला असते. तीही उत्तम कथक नर्तिका आहे.

आपल्या वयाची पासष्टी पार केलेल्या मनीषा साठे या नृत्यांगनेचा जन्म 26 मे, 1953 या दिवशीचा. आज त्यांनी वयाची पासष्टी पार केलेली असली तरी त्या, त्या वयाच्या वाटत नाहीत. त्यांचा “फिटनेस’ ही एक अचंबित करणारी बाब आहे. त्या स्वतः या वयात रंगमंचावर उत्तम सादरीकरण, तर करतातच पण त्याचबरोबर “कथक नृत्यशैलीच्या गुरू’ असाही त्यांचा लौकिक आहे. बालवयात त्यांनी पं. बाळासाहेब गोखले यांच्याकडे नृत्याचे धडे घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी “झनक झनक पायल बाजे’ या त्या काळात विलक्षण लोकप्रियता लाभलेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित चित्रपटाचे नायक, गुरूवर्य पंडित गोपीकृष्ण यांच्याकडे मुंबईत जाऊन कथक नृत्यशैलीचं नृत्य शिक्षण घेतलं. मनीषाताईंचं वास्तव्य सर्वसाधारणपणे पुण्यात असतं. पण त्यांची भ्रमंती साऱ्या देशात आणि परदेशातसुद्धा सातत्यानं सुरू असते. त्यांनी नृत्य, त्यातही कथक नृत्यच हेच आपल्या साधनेचं क्षेत्र ठरवून घेतलं. तरीही त्यांनी “सरकारनामा’ आणि “वारसा लक्ष्मीचा’ अशा दोन चित्रपटांना नृत्य-दिग्दर्शन केल्याची नोंद सापडते. या कलाकृतींसाठी त्यांना राज्य सरकारचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. त्यांनी रंगमंचावर विविध प्रकारचे नृत्याविष्कार जरी सादर केलेले असले तरी त्यांनी रंगभूमीवर नाटकात काम केल्याचं फारसं दिसत नाही. तरीही त्या पुण्याच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कामात स्वतःला झोकून देऊन काम करताना दिसतात. खरं तर त्या नाटकात काय की चित्रपटात काय केवळ नृत्यप्रधानच नव्हे, तर अन्य प्रकारच्या सामाजिक चित्रपटात वा नाटकात अगदी सहजपणानं भूमिका करू शकतात. तरीही त्यांनी नृत्याचं सादरीकरण, विविध नृत्यविषयक परिसंवादात भाग घेणं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करताना व्याख्यानं देणं, कथक नृत्यविषयक एखादा निबंध सादर करून त्यावर उत्तम प्रकारची दर्जेदार चर्चा घडवून आणणं असंही काही महत्त्वाचं काम केलेलं आहे.

या नृत्यांगनेने अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. मनीषा साठे यांना महाराष्ट्र शासनाचा “राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ 2006 साली प्राप्त झालेला आहे. याचा अर्थ सरकारदरबारी त्यांच्या कामाची नोंद घेतली गेली आहे. त्यानंतर “गानवर्धन’ या संस्थेचा विजया भालेराव पुरस्कारही त्यांनी मिळवला आहे. “सिटाडेल’ या मासिकामार्फत दिला जाणारा “सिटाडेल एक्‍सलंस अवॉर्ड’सारखा मानाचा पुरस्कारही त्यांनी मिळवला आहे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’तर्फे दिला जाणारा “श्री गोळवलकर गुरुजी पुरस्कार’ही त्यांना मिळाला आहे. शिवाय त्या “अजित सोमण स्मृती पुरस्कारा’च्याही मानकरी ठरल्या आहेत. अशोक परांजपे स्मृती पुरस्कारानं मनीषाताईंचा गौरव करण्यात आलेला आहेच पण त्याचबरोबर कथक नृत्याच्या क्षेत्रातलं एक मोठ्ठं नाव म्हणजे रोहिणी भाटे, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा “पंडित रोहिणी भाटे पुरस्कार’ हाही त्यांना प्राप्त झालेला आहे. पुरस्कार हा कलावंताच्या कामगिरीची एक प्रकारे पावती असल्याचं मानलं जातं. त्यामुळं हे पुरस्कार तर महत्त्वाचे आहेत किंवा असतातच पण कलावंताचं आणि त्याच्या कलेचं नाणं हे खणखणीतपणे वाजणारं असायला हवं.

चांगलं नाव आहे. घरचं बरं आहे. समाज आणि कलाजीवनात चांगला लौकिक आहे आणि हे सारं असताना मनीषा साठे या कलावतीचे पाय जमिनीवर आहेत हे सर्वात महत्त्वाचं. एखाद्या समारंभात वा अगदी सहजपणानं पुण्याच्या नाट्य परिषदेच्या कार्यालयात भेटणाऱ्या मनीषाताई दोन शब्द बोलल्याशिवाय पुढं निघून गेल्या असं क्वचितच घडतं. “अर्ध्या हळकुंडानं पिवळं’ होण्याचा प्रकार नाही. मस्ती नाही. माजुर्डेपण तर मुळीच नाही. याच त्यांच्या स्वभावामुळं गेली 45 वर्षे त्या त्यांची “मनीषा नृत्यालय ट्रस्ट’ ही संस्था चालवून शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींना नावारूपाला आणू शकल्या आहेत. शांभवी वझे ही त्यांची कन्यासुद्धा त्यांचीच शिष्या आहे आणि तिचं नाव एक उत्तम कथक नर्तिका म्हणून साऱ्या जगात आज घेतलं जात आहे. आईच्या पावलावर पाऊल टाकून कन्या शांभवी हीही अनेक ठिकाणी कार्यक्रम करताना बघायला मिळते. मनीषाताईंचं विशेष कौतुक म्हणजे त्या केवळ नृत्यकला शिकवीत नाहीत, तर पायात चाळ बांधून आणि कानाला हात लावून आपल्या गुरुजनांचं स्मरण करून आपल्या शिष्यगणांसह 2।।-3 तासांचा देखणा कथक नृत्याविष्कार अगदी सहजपणानं सादर करतात आणि तेच त्यांचं वैशिष्ट्य मानायला हवं. मनीषाताई साठे यांनी देश-विदेशातल्या कोणकोणत्या रंगमंचावर आपले कार्यक्रम आजवर सादर केलेले आहेत याचा नुसता तपशील बघितला तरी या नृत्यांगनेच्या लोकप्रियतेची आणि किर्तीचीही कल्पना अगदी सहजपणानं येऊ शकते. त्यांच्या कलेचा दर्जाही ठरवता येऊ शकतो.

कोणकोणत्या संगीत-नृत्य-नाट्य महोत्सवात त्यांची कला आणि कार्यक्रम सादर झालेले आहेत त्यावरूनही त्यांच्या कलेचा एकूण स्तर ठरवता येतो, किंवा ठरवला जातो. मनीषा साठे यांनी आजवर पुण्यात दरवर्षी होणाऱ्या “सवाई गंधर्व गान महोत्सवा’त आपला नृत्याविष्कार आपल्या शिष्यवर्गाला घेऊन सादर केलेला आहे. पुण्यातच दरवर्षी होणारा आणि प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला गेलेला “शनिवारवाडा कला महोत्सवा’तही मनीषा साठे आणि त्यांचा शिष्यवर्ग हजेरी लावतोच. लखनौच्या नृत्य महोत्सवातही मनीषा साठे यांचा कार्यक्रम असतोच. आसाम राज्याच्या गुवाहाटीमध्ये होणाऱ्या नृत्य महोत्सवासाठी त्यांना निमंत्रण असतंच. शिवाय “टाटा’ आणि “खजुराहो’ नाट्यनृत्य महोत्सवासाठीही त्यांना निमंत्रित केलं जातं. मुंबईच्या “नेहरू सेंटर’मध्ये होणाऱ्या नृत्यमहोत्सवात त्या सहभागी होतात. या खेरीज परदेशात म्हटलं तर मनीषाताईंनी आजवर चीन, बहरीन, स्वीडन, जपान, अमेरिका इत्यादी देशांमध्ये भरणाऱ्या अनेक प्रतिष्ठित स्वरूपाच्या नृत्य-नाट्य महोत्सवात सामील झालेल्या आहेत आणि आपली कथ्थक नृत्याची बहारदार शैली तिथल्या तिथल्या मंडळींना दाखवून त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाची “वाहवा’ मिळवलेली आहे. त्यांचे एकटीचे आणि त्यांच्या नृत्यशाळेचे असे दोन्ही प्रकारचे कार्यक्रम त्यांनी देश-विदेशात केलेले आहेत. मनीषा साठे या पाहताक्षणीच एक सुसंस्कृत नर्तिका दिसतात. त्यांची खूप चांगली छाप पडते. त्यांनी त्यांची स्वतःची खास अशी एक कथ्थक नृत्यशैलीही विकसित केलेली आहे. जगभरात त्या शैलीचं खूप कौतुक होताना दिसतं. त्यांच्या त्या विशिष्ट नृत्यशैलीसाठीही त्या ओळखल्या जातात.

आधी म्हटल्याप्रमाणं मनीषाताई आणि त्यांची नृत्यशैली ही वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणजे काय तर त्यांनी जपानी संगीत प्रणालीवरसुद्धा कथक शैलीत नृत्याचा कार्यक्रम केलेला आहे.”जागतिक शांतता कला परिषदे’तही त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. म्हणजे बघा पुण्यासारख्या शहरातून आपले कलाकार, आपली वाद्य आपले साथीदार घेऊन परदेशात जायचं आणि त्या मंचावर उत्तमोत्तम नृत्य प्रकार सादर करायचे हे वाटतं ते सोपं तर नाहीच उलट खरं तर अवघडच आहे. परंपरागत कथ्थक नृत्यशैली आणि नव्या प्रकारचं संगीत यांचाही उत्तम मेळ घालून त्यांनी अनेक प्रकारचे प्रायोगिक नृत्य प्रकारही सादर केलेले आहेत. खासगी आणि मध्यवर्ती सरकार तर्फेही मनीषाताईंच्या अनेक शिष्यांना शिष्यवृत्त्याही प्राप्त झालेल्या आहेत. याचाच अर्थ त्या स्वतः केवळ सादरीकरण करणाऱ्या कलावती नाहीत, तर उत्तम प्रकारच्या गुरूही आहेत.

साठवण
डॉ. विश्‍वास मेहेंदळे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.