जकार्ता : इंडोनेशियामध्ये अजगराने महिलेला जिवंत गिळल्याचा धक्कादायक समोर आला आहे. महिलेची हत्या केल्यानंतर अजगराने तिला संपूर्ण गिळले. ही महिला घराजवळील रबर मळ्यात कामाला जात होती. महिला बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान त्यांना जवळच्या जंगलात पोट फुगलेला अजगर दिसला. लोकांनी अजगराला मारून त्याचे पोट फाडले तेव्हा त्यात महिलेचा मृतदेह दिसला. या घटनेनंतर इंडोनेशियासह जगभरात अजगरांबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. अॅमेझॉनच्या जंगलात आढळणाऱ्या अॅनाकोंडाला ‘मॅन ईटर’ असेही म्हणतात. हे साप आकारानेही खूप मोठे असतात.
स्थानिक वृत्तानुसार, 50 वर्षीय महिला इंडोनेशियातील जाम्बी प्रांतातील रहिवासी होती. बेटारा जांबीचे पोलीस प्रमुख एकेपी एस हारेफा यांनी सांगितले की,’पीडितेचा मृतदेह सापाच्या पोटात सापडला होता. त्यांनी सांगितले की, रविवारी रात्री पीडितेच्या पतीला तिचे काही कपडे आणि उपकरणे सापडली जी त्याने रबर मळ्यात वापरली होती. यानंतर त्याला पत्नीचा शोध घेण्यासाठी शोध पथकाला पाचारण करावे लागले. शोधाच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी त्यांना जवळच्या जंगलात 5 मीटर लांबीचा अजगर दिसला.’
हरेफा यांनी सीएनएनला सांगितले की,’अजगराचे पोट फुगले होते. शोध पथक आणि त्यांच्यासोबत उपस्थित ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी सापाला मारले. त्यांनी पोट कापले असता आतमध्ये महिलेचा मृतदेह पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अशा घटना दुर्मिळ असल्या तरी इंडोनेशियामध्ये अजगराने कुणाला ठार मारून खाण्याची ही पहिलीच घटना नाही. 2017 ते 2018 या कालावधीत देशात असेच दोन मृत्यू झाले आहेत.’