नवी दिल्ली – नवी दिल्लीमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या ‘जी-20′ परिषदेसाठी आपण उपस्थित राहू शकणार नाही, असे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. त्यावेळी पुतीन यांनी या परिषदेला आपण प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नसल्याचे पंतप्रधान मोदींना सांगितले आहे. आपल्या ऐवजी “जी-20′ परिषदेत परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह हे रशियाचे प्रतिनिधीत्व करतील, असे पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले.
पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरून झालेल्या संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी विविध मुद्यांचा आढावा देखील घेतला. त्यामध्ये द्विपक्षीय सहकार्य आणि अलिकडेच झालेल्या “ब्रिक्स’ परिषेदेदरम्यान विविध नेत्यांकडून व्यक्त झालेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडीविषयक मतांचाही समावेश होता, असे पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
पुढील महिुन्याच्या 9 आणि 10 तारखेला नवी दिल्लीत “जी-20′ परिषद होणार आहे. या परिषदेला आपण उपस्थित राहू शकणार नाही, असे पुतीन यांनी सांगितले. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या “जी-20′ परिषदे अंतर्गत झालेल्या सर्व उपक्रमांना रशियाने प्रथमपासून पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांना धन्यवाद देखील दिले. या चर्चेच्या अखेरीस दोन्ही नेत्यांनी नियमित संपर्क कायम ठेवण्याचे मान्य केले.