मानवतेवर घात “हिंगणघाट’

समतेची चळवळ ज्या महाराष्ट्रात सुरु झाली तिथंच सावित्रीच्या लेकीला पेट्रोल टाकून पेटवण्यात आलं. 30 वर्षांपूर्वी रिंकू पाटील ते आता हिंगणघाट…असा मानवतेचा घात अव्याहत सुरु आहे. पुरुषी पाशवी अहंकाराने हे बळी रोखण्यासाठी प्रबोधनाची चळवळ अधिक प्रभावी करण्याची गरज आहे. तरच या कोवळ्या कळ्या खुडल्या जाणार नाहीत. सुंदर आयुष्य जगण्याचा त्यांचा हक्क हिरावला जाणार नाही.


नकार पचवणं शिका!

-पूजा ढेरिंगे

तरुणाई इतकी अहंकारी आणि असंयमी होऊन निर्णय का घेत आहे? प्रेमातला नकार पचवून समोरच्या व्यक्तीच्या निर्णयाचा आदर केलाच जाऊ शकत नाही का? बलात्कार, ऍसिड हल्ले आणि आता पेट्रोल फेकून जाळणं? एखाद्याचं आयुष्य इतकं स्वस्त आणि तरुणाई म्हणून आपल्या संवेदना इतक्‍या अहंकारी झाल्या आहेत का?

एकीकडे महिलांनी त्यांचे विचार मांडायला हवे, स्वतंत्र होऊन स्वतःसाठी स्टॅंड घ्यायला हवा, असे म्हटले जाते. पण तिच्या स्टॅंडची अशी अवहेलना केली जाणार असेल तर भीतीपोटी महिला आणि तिचे पालक तिला पूर्वीसारखं घरातून बाहेर तरी पडू देतील का? या घटनेचा मागोवा फास्ट ट्रॅक न्यायालयांतर्गत केला जाऊन पुराव्यांसकट तो असुर फाशी जावा. कारण अशा संवेदनशील घटनांचा निकाल लावण्यासाठी होणारी दिरंगाई ही बऱ्याचदा आरोपीसाठी सुटकेचा मार्ग होते. अशा घटनांचे न्यायालयीन निकाल तातडीने लागले तर आणि कायदे अधिक कडक आणि तडक झाले तरच अशा गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याची गांभीर्यता लक्षात येईल.

हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळल्या गेलेल्या मुलीचा मृत्यू झाला, हे असं ऐकून मला हादरायला होतं. घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी मला समजते ज्या पुरुषाने पेट्रोल टाकले त्याला बायकोही होती. हे वाचून अनेकजण म्हणतील त्यात नवल ते काय, आपला समाज पुढारलाय? मग हे पुढारलेपण पुरुषांच्या सोयीनुसार आहे का? का कधी ऐकायला येतं मुलीने मुलाकडे प्रेमाची साक्ष दिली आणि त्याच्याकडून मिळालेल्या नकारातून तिने त्याच्यावर बलात्कार, अत्याचार, सूड, जिवेमारणे किंवा पेट्रोल टाकून जाळले? पितृसत्ताक समाजाचा हा पुरुष माजोरडा आणि दिवसेंदिवस अहंकारी होत चालला आहे.

आताच्या परिस्थितीला घडत असलेल्या कित्येक घटनांवरून एक गोष्ट ठळकपणे समोर येते ती म्हणजे, पुरुषाला नकार पचवता येत नाही. पुरुषांचे आणि लहानपणापासून शाळकरी असतानाचे सतत हट्ट पुरवणे, त्याला कशालाच नकार न देणे हा त्याच्या गर्वाचा भाग होऊन जातो. त्यामुळे येणाऱ्या अनेक वर्षांत त्याची वागणूक अधिक हट्टी आणि सनकी होत जाते. नेमकं काय चालू आहे देशात? आपली पिढी समंजस आणि विचार करून पावलं उचलणारी आहे. स्वतःच्या आयुष्यात रोज नवनवीन आव्हाने आहेत. मग तरीही आपण एकमेकांचे शत्रू का बनत आहोत? “सगळा समाज आपलाच आहे’ असं समजून जर कुणालाच हानी होणार नाही असं जगलं तर खरंच काही नुकसान होणार आहे तुमचं? अशावेळी तरुणाईने नाही काही तर थोडासा अध्यात्माचा आधार घ्यावासा वाटतो. पूर्वीच्या काळी विचारसरणी जरी बुरसटलेली असली तरी त्यांच्यासाठी स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनाचे महत्त्व मोलाचे होते. स्वतःला आतून शांत ठेवले तर या गोष्टींचा विचारही मनात येणार नाही आणि आतून शांत ठेवायचे म्हणजे तुमचे विचार स्वच्छ आणि प्रामाणिक असायला हवे. प्रामाणिक माणूस भले कष्ट जास्त करेल परंतु त्याच्या नैतिक विचारांशी प्रतारणा करणार नाही.
पुन्हा विषय फिरून आपल्या संस्कार, स्त्री पुरुष रचनेचा बाऊ आणि लैंगिक शिक्षण यावरच येतो. थोडं स्वतःला विचारांनी मोठं करू, थोडं येणाऱ्या पिढीसाठी आदर्श घडवू! आजच्या घडीला रोज एक मुलगी आयुष्य गमावतेय, येणाऱ्या काळात तिला जाणिवेचा भारत देऊ!


किती इझी झालंय ना…

-प्राजक्ता कुंभार

काय व्यक्त व्हावं कळत नाही पण किती इझी झालंय ना आमच आयुष्यचं संपवणं… सालं, आम्हाला जाळा, आमच्यावर ऍसिड ओता, झालंच तर बलात्कार करा, जमलंच तर जन्माला येऊच देऊ नका. मध्यरात्री ऑनलाईन दिसलो की आम्हाला इझिली अव्हेलेबल समजा… हसलो, मेसेजला रिप्लाय केले की पटलो समजा… नाही केले, तर कशाचा एवढा माज असं विचारा…

पाळीवर जोक करा, ब्राची स्ट्रीप बाहेर दिसली की कुजबुजा…दारू, सिगरेट म्हणजे वाया गेलोय म्हणा…आमच्या वरून आम्हालाच शिव्या द्या… जमलं तर आमच्या प्रत्येक कृतीला आमच्या शरीराशी जोडा… बलात्कार करणाऱ्याचा एन्काऊंटर झाला, की तुमची ह्यूमन राइटची हळहळ दाखवा…त्यांना फाशी होताना, ‘ जाऊद्या हो, माफ करा ‘ असं सुचवून बघा… उठता बसता आम्ही कशा फालतू आहोत हेच दाखवा…

नाही म्हटली, टाक जाळून…
रात्री फिरली, कर बलात्कार…
स्वतःची मतं आहेत, करा जज…

किती ईझी झालंय ना सालं… हवं तेव्हा ओरबडणं… ते नाहीच जमलं तर आमची आयुष्यचं संपवणं….बस एवढच!


भय इथले संपत नाही…!

-श्रीकांत येरूळे

अखेर हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा जगण्याचा संघर्ष संपला. किती दिवस आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार? समाज म्हणून जगण्यास आपण दररोज अपात्र ठरतोय! दररोजचे वर्तमानपत्र उघडले की, महिलांवरील हल्ल्याची एखादी बातमी असतेच! एकविसाव्या शतकातील आधुनिक समाजाचा भाग म्हणून जगत असताना या घटना आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. हे काय आजचं आहे का? म्हणून आपण वेळ मारून नेत आहोत. मात्र, हे कधी आपल्या दारावर धडकेल, हे सांगता येत नाही. समाजात राहत असताना आपल्या वृत्तीचा इतर व्यक्तींना कसलाही त्रास होता कामा नये, किमान याची दखल तरी आपण घेऊ शकतो. नांदेड, औरंगाबाद, मुंबई आणि आता वर्ध्यातील घटनेने महाराष्ट्राच्या सामाजिक संस्कृतीला काळिमा फासला आहे. महाराष्ट्रातील या घटनांकडे पाहताना खरेचं आपण एका प्रगतशील, संतांच्या, पुढारलेल्या राज्यात राहतोय का, हा प्रश्‍न पडतो.

कायद्याबद्दल लोकांच्या मनात भीती नसणे, हे कायद्याचं अपयश आहे. निर्भया, कोपर्डी आणि अशा इतर असंख्य खटल्यांतील आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही. लवकरात – लवकर खटल्यांचा न्यायनिवाडा होऊन आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये कायद्याला ग्राह्य धरण्याची वृत्ती संपेल! र्गीीींळलश वशश्ररूशव ळी र्क्षीीींळलश वशपळशव म्हणतात ते अगदी खरं आहे. न्यायाचा प्रवास जिल्हा न्यायालय, उच्च व सर्वोच्च न्यायालय असा चालत असतो. त्यात पुन्हा सर्वोच्च न्यायलयाने फाशीची शिक्षा सुनावली की, क्रौर्याची सीमा ओलांडणारे गुन्हेगार राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणार! हे वर्षानुवर्षे असेच चालत आहे. यात बदल होणे गरजेचे आहे.जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगाराला तत्काळ शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्र राज्यात महिला अत्त्याचारांचे वेगवेगळ्या न्यायालयात जवळपास एकोणतीस हजार खटले प्रलंबित आहेत. हे खटले निकाली काढण्यासाठी राज्य सरकार 138 जलदगती न्यायालयांची स्थापना करणार आहे. हा चांगला निर्णय सरकारने घेतला आहे.

आजही महिलांना उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाते. एकतर्फी प्रेमातून असंख्य तरूणींना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. नकार स्वीकारण्याची मानसिकता पुरुषसत्ताक वृतीमध्ये दिसत नाही. यामध्ये कुठेतरी घरातून मिळणाऱ्या संस्काराचा परिणाम असतो. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तो त्याचा अधिकार कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.

अनोळखी आणि बाहेरची माणसं यांच्यापासून सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे, मात्र घरातील व्यक्तींपासून आपल्याला असुरक्षितता वाटत असेल तर काय करणार? हाही प्रश्‍न अनुत्तरीत राहतो. जिथेही काही अनुचित प्रकार घडत असेल त्या ठिकाणी आपण बघ्याची भूमिका घेतली नाही पाहिजे. ज्या – ज्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत, अशा ठिकाणी आपण त्याचा विरोध केला पाहिजे.


तेव्हा खरी ‘निर्भया’ जन्माला येईल

-प्रीती फुलबांधे

हिंगणघाट प्रकरणी मन सुन्न झालं. पुरुषी अहंकाराने आता परिसीमाच ओलांडली. आणि हा अहंकार आता थेट आम्ही जगावं कि मरावं हे ठरवतोय. त्यामुळे या अहंकाराला आता वेळेतच ठेचून मारले पाहिजे. कारण उद्या हि घटना आपल्या घरातील असू शकते. न्यायव्यवस्था निर्णय देईल तेव्हा देईल पण आता अशा घाणेरड्या पुरुषी मानसिकतेबाबत निर्णय घेणे गरजेचे वाटते. आमचं जीवन एवढं स्वस्त झालं का? म्हणजे आम्ही काय बोलायचं, कस वागायचं कोणते कपडे घालायचे हे तुम्ही ठरवणार,वल्गर कॉमेंट करणार. आम्ही विरोध केला तर थेट पेटवून देणार. स्त्री स्वावलंबी व्हावी म्हणून सरकार मोठया मोठया योजना राबवते. मात्र स्वालंबी होण्याआधीच तिला ठार करणाऱ्या अशा पुरुषी अहंकाराला ठेचण्यासाठी यांच्याकडे कोणत्या योजना आहेत?

सरकाराला सुद्धा काय म्हणावे, आज केंद्रात बहुमताचे सरकार आहे. मोठया प्रमाणात महिलांचे संघटन सुद्धा आहेत. मात्र दुर्दैव्य म्हणावे लागेल. या सरकारने सैन्यदलांतील अधिकारपदांवर महिला असू नये, पुरुष त्यांचे आदेश ऐकणार नाहीत, असा युक्तिवाद न्यायालयात केला, हा पुरुषी अहंकाराला दिलेला पाठिंबाच म्हणावे लागेल. “सैन्यात जास्त लोक ग्रामीण भागातून येतात त्यामुळे त्यांना महिलांचं ऐकण्याची सवय नसते.” असं कारण खुद्द सरकाने न्यायालयात दिले. हे खूप जास्त भयंकर आहे. महिलांनी आता कोणावर अवलंबून न राहता येणाऱ्या आव्हानांचा सामना करणे शिकले पाहिजे. तेव्हा खरी निर्भया जन्माला येईल.’

Leave A Reply

Your email address will not be published.