खेड तहसील कार्यालयासमोर वारसांचे उपोषण आंदोलन
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – मृत असलेल्या दलित व्यक्तीच्या नावावरील जमीन नऊ वर्षानंतर बोगस व्यक्तीला उभे करून खरेदीखत करण्यात आले. या बोगस खरेदी खताच्या विरोधात न्याय मिळत नसल्याने मयताच्या वारसांनी खेड तहसील कार्यालयासमोर सोमवारी (दि. 16) उपोषण आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान दोन दिवसांत ठोस निर्णय झाला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पाठींब्यासाठी आंदोलनात सहभागी झालेले भीमशक्ती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष तथा खेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस यांनी दिला आहे.
पाईट (ता. खेड) येथील चिखलवाडी गावातील 2 एकर 6 गुंठे जमिनीबाबतीत हा प्रकार घडल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. चिखलवाडी येथील गट क्रमांक 271 ही जमीन असून तिचे सन 2006मध्ये खरेदीखत करण्यात आले. जमिनीचे मूळ मालक तत्पूर्वी म्हणजेच 1996 मयत झाले आहेत. खरेदी करणाऱ्या व्यक्ती धनदांडगा असल्याने त्यांनी बोगस परवानगी घेऊन व बनावट व्यक्ती उभी करून हे बोगस खरेदीखत केले.
मूळ मालकाचे वारस, नातेवाइक व शासनाची त्यांनी फसवणूक केली. त्यावरून मयताच्या कन्या मीरा गुलाब सोनवणे, त्यांच्या परिवाराने विविध ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले. खेड तहसीलदार यांना देखील वारंवार माहिती देऊन निवेदन दिले; मात्र न्याय मिळाला नाही म्हणून सोमवारी (दि. 16) मीरा सोनवणे व इतर नातेवाईक यांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनाला भीमशक्ती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्याच्यासह भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे, खेड तालुका आरपीआयचे अध्यक्ष कृषिकेष डोळस, भीमशक्ती संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष अनिल जाधव यांच्यासह मूळ नातेवाईक मिलिंद सोनवणे, राहुल सोनवणे, गौतमी सोनवणे, लक्ष्मीबाई सोनवणे, इंदुमती सोरटे, संस्कृती सोनवणे, समृद्धी सोनवणे सहभागी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांना निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर यांनी भेट देऊन त्यांची मागणी समजावून घेतली.
गरीब दलित जनतेच्या अनेक जमिनी धनदांडग्यांनी बळकावल्या आहेत. न्याय मिळण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडे ते हेलपाटे मारत आहेत. अधिकारी या दलित जनतेकडे दुर्लक्ष करीत धनदांडग्यांना अभय देत आहेत. पाईट येथील मयत दलित व्यक्तीच्या नावावरील जमीन नऊ वर्षांनंतर अज्ञात बोगस व्यक्तीला उभे करून खरेदीखत करणाऱ्यावर फसवणुकीसह ऍट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करून या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-विजय डोळस, जिल्हा अध्यक्ष भीमशक्ती संघटना