पुरंदरवासियांना प्रतिक्षा सुपरस्टार रजनीकांतची

विख्यात अभिनेत्याचे मूळ गाव आहे मावडी कडेपठार

दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमातील सुपरस्टार रजनीकांत यांना नुकताच सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. रजनीकांत हे सुपरस्टार असले तरी त्यांनी सर्वाधिक चित्रपट दक्षिण भारतामध्येच केलेले आहेत. रजनीकांत यांचे चाहते संपूर्ण देशात तसेच विदेशात देखील आहेत. रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगलोर येथे झाला होता.

मात्र आपल्याला ऐकून आश्‍चर्य वाटेल; मात्र, ही गोष्ट खरी आहे की रजनीकांत हे पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. रजनीकांत यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्‍यातील मावडी कडेपठार हे आहे. त्यांचे हे गाव जेजुरी पासून अतिशय जवळच आहे. 2400 लोक या गावांमध्ये राहतात. या गावांमध्ये गायकवाड नावाची 30 कुटुंबे आहेत. रजनीकांत यांच्या आजोबांचे देखील या गावामध्ये घर होते. मात्र, काही वर्षांपूर्वी रजनीकांत यांचे आजोबा कर्नाटकामध्ये गेले होते. कर्नाटकातील बसवणा या गावात ते रोजगार शोधण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना तिथे काही काम न मिळाल्याने त्यांनी थेट बेंगलोर गाठले. त्यानंतर ते बेंगलोरला स्थायिक झाले.

रजनीकांत यांच्या मूळ गावचे लोक आजही रजनीकांत यांच्या आजोबांची आठवण सांगत असतात. रजनीकांत यांची मावडी कडेपठार येथे काही एकर जमीन देखील असल्याचे सांगण्यात येते. तसेच त्यांचे घर देखील येथे आहे. आता मावडी कडेपठारच्या ग्रामस्थांना रजनीकांतच्या पदस्पर्शाची प्रतिक्षा आहे.
माजी सरपंच वैशाली खोमणे यांनी देखील सांगितले की, रजनीकांत यांनी आमच्या गावाला एकदा भेट द्यावी. मात्र, रजनीकांत यांनी अजूनही या गावाला कधीही भेट दिलेली नाही. वर्ष 2017 मध्ये रजनीकांत हे राजकारणात प्रवेश करणार होते. त्यावेळी गावच्या लोकांनी यशवंतराय मंदिरामध्ये पूजाअर्चा देखील केली होती.

वर्ष 2010 मध्ये रजनीकांत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. त्यावेळी रजनीकांत म्हणाले होते की, मी एक मराठी माणूस आहे. त्यासोबत तमिळ आणि कर्नाटकचा देखील आहे. त्याहीपेक्षा म्हणजे मी एक भारतीय आहे, असे ते म्हणाले होते. त्यावेळी त्यांचे म्हणणे सर्वांनाच भावले होते.

काही वर्षांपूर्वी त्यांच्या भावकितील लोकांनी रजनीकांत यांच्या आजोबाची बेंगलोर येथे जाऊन भेट घेतली होती, असे जुने लोक सांगतात. लोणावळा येथे काही वर्षापूर्वी रजनीकांत यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळेस गावच्या श्रीरंग गायकवाड यांनी रजनीकांत यांची भेट घेतली होती. तसेच त्यांना गावांमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते.

मात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे रजनीकांत यांना या गावाला अजूनही भेट दिली नाही. मात्र, रजनीकांत यांनी आपल्या गावात एकदा भेट घेऊन गावाची पाहणी करावी, असे अनेकांना वाटते. रजनीकांत यांचे गावामध्ये घर देखील आहे. मात्र, ते एकदाही इथे आले नाहीत. तसेच त्यांचे हे घर आता पडलेले आहे, असे देखील अनेक जण सांगत असतात. आता फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर तरी हा सुपरस्टार आपल्या मूळ गावी येतो की नाही, ते पहायचे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.