नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पक्षाचे खासदार भगवंत मान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाने जनमत चाचणी घेऊन ही निवड केली असून अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी या चाचणीचा निष्कर्ष जाहीर केला. फोन आणि व्हॉट्सऍपद्वारे ही जनमत चाचणी घेतली गेली. त्यात लोकांना आप पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा असे विचारले गेले. त्यावेळी मतदान करणाऱ्या लोकांपैकी 93 टक्के लोकांनी भगवंत मान यांचेच नाव सुचवले.
यातच,एका हिंदी वृत्तवाहिनीने मुलाखतीत भगवंत मान यांना त्यांच्या ‘मद्यपानाच्या समस्ये’वर टीका होत असल्याचे विचारले, यावेळी भगवंत मान म्हणाले, ‘मी त्यांच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. सुखबीर सिंग बादल यांच्या पक्षाचे (अकाली दल) नेतेही ड्रग्ज प्रकरणात सहभागी आहेत. मला त्यांच्या एनओसीची (ना हरकत प्रमाणपत्र) गरज नाही. मी राज्यातील जनतेचे रक्त पीत नव्हतो.’ असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिले आहे.
दरम्यान, 21 लाख जणांनी या चाचणीत भाग घेतला. भगवंत मान हे पंजाबातील संगरूर मतदार संघातून आपच्या तिकीटावर दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. बाकीच्या काही जणांनी नवज्योत सिद्धु आणि काही जणांनी अरविंद केजरीवाल यांच्या नावाला पंसती दिलेली आढळली. भगवंत मान हे मुळचे विनोदी एकपात्री प्रयोग करणारे कलाकारही आहेत.
ते म्हणाले की पुर्वी लोक माझा चेहरा पाहिला की हसायचे पण आता मात्र ते रडतात आणि आम्हाला वाचवा म्हणतात अशी प्रतिक्रीया देत मान यांनी लोकांचे आभार मानले. ज्या प्रचंड मतांनी लोकांनी मान यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे ते पहाता आता पंजाबात आम आदमी पक्षच सत्तेवर येईल असा विश्वास केजरीवालांनी व्यक्त केला.