जामखेड / कर्जत – गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील बहुचर्चित व प्रतिष्ठेची बनलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीचे निकाल नुकतेच हाती आले आहेत. भाजपचे नेते व माजी मंत्री राम शिंदे विरुद्ध कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली.
या निवडणुकीदरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप तसेच विविध मुद्द्यांवरून ही निवडणूक राज्य पातळीवर चांगलीच गाजली. भाजपच्या ताब्यात असलेली कर्जत नगरपंचायत आपल्याकडे ओढून आणण्यात अखेर आमदार रोहित पवार यांना यश आल्याचे या निवडणुकीच्या निकालानंतर पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एकूण 17 जागांपैकी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पारड्यात 15 जागा पडल्या असून जनतेने कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा कौल हा आमदार रोहित पवार यांच्या विकासकामांच्या बाजूने दिला असल्याचं स्पष्ट झालं आहे. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची बनली होती. त्याचबरोबर कर्जतकरांनी अनोखा प्रचार देखील अनुभवला.
शेवटच्या क्षणापर्यंत या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. पण अखेर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळालं आहे.
कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचा गड राहिलेल्या कर्जत शहरावर अखेर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्यात रोहित पवार यशस्वी झाले आहेत.
येणाऱ्या काळात कर्जत शहराचा संपूर्णतः कायापालट करून विकासाभिमुख दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून शहरात कामे होतील, त्याचबरोबर गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले व प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं रोहित पवार यांनी जनतेला म्हणत भरघोस मताधिक्क्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभारही मानले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे एकूण 15 विजयी उमेदवार यादी –
प्रभाग क्रमांक 1 ज्योती शेळके – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 2 लंकाबाई खरात – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 3 संतोष म्हेत्रे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 5 रोहिनी घुले – काँग्रेस
प्रभाग क्रमांक 6 तोटे मोनाली – काँग्रेस
प्रभाग क्रमांक 7 सतीश पाटील – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 8 भाऊसाहेब तोरडमल – काँग्रेस
प्रभाग क्रमांक 9 अमृत काळदाते – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 10 उषा राऊत – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 12 राऊत नामदेव – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 13 सुपेकर सुवर्णा – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 14 कुलथे ताराबाई – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 15 भास्कर भैलुमे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 16 प्रतिभा भैलुमे- राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 17 छाया शेलार – राष्ट्रवादी