पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या भूसंपादन प्रक्रियेला आता गती येणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम भागातील खेड शिवापूर ते उर्से (ता. मावळ) या दरम्यान रिंग रोड केला जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिध्द केली असून त्यावर नागरिकांच्या हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत.
मावळ, मुळशी, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यातून हा रिंगरोड जाणार आहे. त्यानुसार शासनाने रिंगरोडसाठी जागा संपादन करण्यासाठी संबधित प्रांताधिकारी यांची नियुक्ती केली आहे. तर भूसंपादनाबाबत वाद मिटविण्यासाठी लवाद म्हणून पुणे विभागीय आयुक्त यांची नेमणूक केली आहे. रिंगरोडबाबत हरकती या प्रातांधिकारी यांच्याकडे सादर करता येणार आहे. एमएसआरडीसीने हाती घेतलेल्या रिंगरोडला यापूर्वीच राज्य सरकारकडून मान्यता दिली असून त्याला “राज्य महामार्गाचा दर्जा’ मिळाला आहे. हा प्रस्तावित रिंगरोडची एकूण लांबी सुमारे 172 किलोमीटर असून तो 110 मीटर रूंदीचा आहे. खेड, पुरंदर, हवेली, भोर, मावळ आणि मुळशी या तालुक्यातून हा रिंगरोड जाणार आहे. त्यासाठी 2,300 हेक्टर जागेची आवश्यकता असून प्रकल्पासाठी सुमारे 14 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
या रिंगरोडमधोमध तीस मीटर रूंदीची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात साठ मीटरचा रिंगरोड करण्यात येणार आहे. भविष्यात गरज पडल्यास रिंगरोडची रूंदी वाढणे शक्य व्हावे हा देखील त्याचा उद्देश आहे. दोन टप्प्यात तो विकासित करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. सर्व्हेक्षणापासून ते सर्व प्रकारच्या मान्यता या रिंगरोडसाठी मिळालेल्या आहेत. मागील महिन्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत रिंगरोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करावी, असे आदेश त्यांनी एमएसआरडीसीला दिले होते. त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया गती मिळाली असून आता अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.
रिंग रोडचा पश्चिम भागचा मार्ग
केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव, रांजे, रहाटावडे, कल्याण,घेरासिंहगड, खासगाव, मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी बुद्रुक, सांगरूण,बहुली, कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरावडे, कासार आंबोली, भरे, आंबडवेट, घोटावडे, रिहे, केससेवाडी, पिंपलोळी, पाचणे, चांदखेड, बेंबड ओहोळे, धामणे, परंदवाडी, उर्से