मांजरी ,दि २५ – मांजरी बुद्रुक – भापकर मळा आणि मोरे वस्ती – मांजरी ग्रीन या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी येथील आम आदमी पक्षाचे राजेंद्र साळवे यांनी खड्यात बसून आंदोलन केले.त्यानंतर लगेचच महापालिकेने रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.
येथील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय लहान-मोठे अपघातही घडत आहेत. त्यामुळे महापालिकेने येथील खड्डे बुजवावेत अशी मागणी निवेदने देऊनही वारंवार केली जात होती.मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे शुक्रवारी खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत शनिवारी महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरवात केली आहे.आता जरी तात्पुरती दुरुस्ती केली असली तरी भविष्यात रस्ता रुंदीकरण आणि चांगले रस्ते करून द्यावेत, अशी आमची आग्रही मागणी आहे, असे राजेंद्र साळवे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान आंदोलनाचे वृत्त दैनिक प्रभात मध्ये आल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी तत्काळ रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. त्याबद्दल येथील नागरिकांनी प्रभात ला धन्यवाद दिले.