पुणे, दि. 29 – चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे नियोजन करण्यात येत असून त्यासाठीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. शनिवारी दि. 1 ऑक्टोबरला रात्री 11 वाजेपासून दि. 2 ऑक्टोबर सकाळी 08:00 वाजेपर्यंत वाहतूक बंद करण्यात येणार आहे. दि.2 ऑक्टोबरला पहाटे 02:00 वाजता ब्लास्ट करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे रिटेनिंग वॉलचे व माती भरावाचे काम सुरू आहे. श्रृंगेरी मठाच्या समोरील सेवा रस्त्याचे काम देखील करण्यात येत आहे. बावधनकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रॅम्प क्र.6च्या खडकामध्ये ब्लास्टींगद्वारे खोदकामही सुरू आहे.
एनडीए ते मुंबई या रॅम्प क्र.5चे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडसाठी रॉक ब्लास्टींगचे काम करण्यात येत आहे. अवजड वाहने शहराच्या बाहेर दोन्ही बाजूस (मुंबई बाजू व सातारा बाजू) थांबवावी लागणार आहेत. यासाठी टोल नाक्यावर व इतर ठिकाणी सूचनाफलक लावण्याचे काम सुरू आहे. इतर वाहनांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावरून वाहतूक वळवावी लागणार आहे. त्यासाठी दिशादर्शक फलक बसविण्याचे काम देखील सुरू आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना नियोजित पूल पाडण्याच्या वेळेत वाहतूक नियोजनाबाबत अवगत करण्यात आले आहे. नागरिकांनी पूल पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अत्यावश्यक असल्यासच या मार्गाने प्रवास करावा, अन्यथा पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.