स्वच्छतेसाठीही पुणेकर ‘बिझी’च

दहा मिनिटेही वेळ नाही; महिन्याभरात 420 जणांकडून नोंदणी

पुणे – केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धेत गेल्या तीन वर्षांत लोकसहभाग मिळविण्यात पालिकेस अपयश येत असल्याने मानांकन दरवर्षी घसरत आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना थेट सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेकडून “स्वच्छता मित्र’ ही अभिवन संकल्पना आणण्यात आली. त्यासाठी प्रत्येक पुणेकराने शहर स्वच्छतेसाठी केवळ
10 मिनिटे द्यावीत, अशी भावनिक साद घालत “स्वच्छता मित्र’ म्हणून सहभागी होण्याची विनंती केली. मात्र, तब्बल 52 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात अवघ्या 420 पुणेकरांनी गेल्या महिन्याभरात नोंदणी केली आहे.

केंद्र शासनाकडून 2015 पासून “स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत “स्वच्छ शहर स्पर्धा’ सुरू केली आहे. यात महापालिका पहिल्या दोन वर्षांत देशातील पहिल्या 10 शहरांमध्ये होती. तर 2018-19 मध्ये क्रमांक थेट 37 वर फेकला गेला. तर सर्वेक्षणात पालिकेला लोकसहभाग फारसा मिळविता आलेला नाही. त्यामुळे यंदा लोकसहभाग वाढविण्याचा निर्णय घेत, पालिकेने “स्वच्छता मित्र’ ही अभिनव संकल्पना समोर आणली.

महापालिकेकडून शहरभर तसेच रेडीओवरूनही जाहिरात केली जात आहे. महापालिकेने 26 जून 2019 पासून ही नोंदणी सुरू केली असून त्या अंतर्गत केवळ 420 नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यात बॅंक कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

लोकसहभाच वाढेना
अभियानात केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या गुणांकनात लोकसहभागाला सुमारे 25 टक्‍के गुण आहेत. त्यात, नागरिकांनी “स्वच्छता ऍप’ डाऊनलोड करणे, त्यावर तक्रारी करणे, पालिकेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे अशा वेगवेगळ्या बाबी आहेत. मात्र, यात केवळ मोबाइल ऍड डाऊनलोडमध्येच महापालिकेस गुण मिळत आहेत. तर इतर गुणांवर पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे पालिकेकडून गेल्या चार वर्षांत या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिक सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी या अभियानात पुणेकरांचा सहभाग नगण्य असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)