समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – अपवाद वगळता तालुक्यातील सगळेच नेते सोशल मीडियावर “चमकोगिरी’ करणाऱ्या, लाभार्थी आणि स्तुतीपाठक मंडळींच्या गराड्यात रमले आहेत. केवळ स्वार्थासाठी नेत्यांजवळ जाणाऱ्यांना अतिमहत्त्व प्राप्त झाल्यामुळे नेत्यांचे स्वाभिमानी निष्ठावंत कार्यकर्ते मात्र त्यांच्यापासून दुरावले असून त्याचे विपरित परिणाम नेत्यांच्या राजकीय “यंत्रणे’वर होत आहेत.
प्रत्येक नेत्याची सोशल मीडियावर बाजू मांडणारी आणि त्यासाठी प्रसंगी टोकाची भूमिका घेणारी एक “सेना’ गेल्या काही वर्षांत निर्माण झाली आहे. ही सेना नेत्याची छायाचित्रे, चलचित्र सतत सोशल मीडियावर टाकून अविरतपणे नेत्याची बाजू लावून धरत असते. त्यामुळे नेत्यांना सोशल मीडियावर बाजू मांडणारे ही मंडळी रणांगणात लढणाऱ्या योद्ध्यांप्रमाणे वाटू लागली आहेत. परिणामी नेत्यांच्या गाडीत या “नेटिझन्स’ची जागा’ राखीव’ असते. त्याचवेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा नेत्यांच्या “यंत्रणे’तील सक्रिय सहभाग मात्र दिवसेंदिवस घटत चालला आहे.
त्याचबरोबर नेत्यांच्या “जीवावर’ ठेकेदारी अथवा अन्य काही मार्गांनी स्वार्थ साधणाऱ्या लाभार्थी मंडळींची देखील नेत्यांना अक्षरशः भुरळ पडली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची नेत्यांच्या “किचन कॅबिनेट’मधील जागा आता नेटिझन्स आणि लाभार्थ्यांनी घेतली आहे. परिणामी, ही मंडळी कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना नेत्याच्या दूरगामी राजकीय फायद्यापेक्षा स्वतःचा “आर्थिक’ फायदा पाहून त्याप्रमाणे “फिडिंग’ करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
प्रत्येक नेता सतत त्याच त्या लाभार्थी आणि “नेटिझन्स’च्या गराड्यात असल्याने आणि शिवाय त्यांच्याच “फिडिंग’प्रमाणे अनेकांना “ट्रीटमेंट’ देत असल्याने निष्ठावंत कार्यकर्ते मात्र या नेत्यांपासून दुरावत चालले आहेत. शिवाय, नेते सतत या “स्तुतीपाठक चौकडी’च्या गराड्यात असल्याने ग्राउंडवर काय परिस्थिती आहे याचा अनेक नेत्यांना अंदाजही येऊ दिला जात नाही. ठराविक मंडळींकडून केवळ नेत्याचा जयजयकार केला जात असल्याने नेतेही तोच “ग्राउंड रिपोर्ट’ समजून त्याच अविर्भावात वावरत आहेत.
लाभार्थी, नेटिझन्स आणि स्तुतीपाठक मंडळींनी नेत्यांची “मर्जी’ राखत त्यांची यंत्रणा अक्षरशः “हायजॅक’ केली आहे. नेतेही त्यांच्याच गराड्यात राहून राजकीय मैदान मारण्याची स्वप्ने पाहत आहेत. “आर्थिक फायद्यासाठी जवळ आलेल्या “लाभार्थी’ मंडळींशी सल्लामसलत करून राजकीय दिशा निश्चित केल्यास त्याचे विपरित परिणाम या नेत्यांना येत्या काळात नक्कीच पाहायला मिळू शकतात.