पुणे -पार्टी ड्रग्ज म्हणून (कु)प्रसिद्ध असलेल्या मेफेड्रोनची मागणी लॉकडाऊननंतर वाढली आहे. यामध्ये तरुणी झिरो फिगरसाठी तर तरुण जीममध्ये व्यायाम केल्यावर त्रास होऊ नये यासाठी मेफेड्रोनचा वापर करत आहेत. नाइट लाइफची आवड असणारे आयटीजन्स, महाविद्यालयीन विद्यार्थीही यांच्याकडूनही याचा वापर होत आहे.
पुणे पोलीस यापूर्वी कारवाईत नियमितपणे गांजा जप्त करत होते. मात्र, यंदा मेफेड्रोनही अधिक सापडले आहे. मागील पाच महिन्यांत 22 प्रकरणांमध्ये गांजा आणि 21 प्रकरणांमध्ये मेफेड्रोन जप्त करण्यात आला आहे. तर 2022 मध्ये, पोलिसांनी 34 प्रकरणांमध्ये मेफेड्रोन (एम.डी.) आणि 62 प्रकरणांमध्ये गांजा जप्त केला होता. मेफेड्रोन वाहून नेणे सोपे आहे आणि गांजाच्या इतकी त्याला दुर्गंधी नाही, त्यामुळे पोलिसांच्या नजरेत ते सहसा सापडत नसल्याचे अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत समोर आले.
ड्रग्ज विकणारे आणि ग्राहक ओळखणे हे शहर पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे. कारण, लॉकडाऊननंतर ड्रग्सचा समावेश असलेले जवळपास सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाइन पेमेंट पद्धतीने केले जातात. काही वेळा, ऑनलाइन डिलिव्हरी सेवांचा वापर करून ड्रग्ज देखील वितरित केले जातात.
– सुनील थोपटे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक-2
समुपदेशक निहार हसबनीस म्हणतात…
सध्याच्या रुग्णांपैकी 90 टक्के पेक्षा जास्त रुग्णांना मेफेड्रोनचे व्यसन आहे आणि ते सर्व 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. मेफेड्रोन हे कृत्रिम आणि उत्तेजक औषध आहे. हे अतिरिक्त ऊर्जा देते आणि जास्तीस्त जास्त कालावधीसाठी व्यक्तीला एकाग्र ठेवते. याचा दीर्घकाळ केलेला वापर लक्षात घेता आरोग्य बिघडते आणि शरीराला अधिक उपायकारक ठरते. मेफेड्रोनची विक्री टॅब्लेट, पावडर आणि इंजेक्शन स्वरुपात होते. अनेक तरुण मेफेड्रोन घेतल्यानंतर मद्यप्राशन पसंत करतात. आमच्या सेंटरमध्ये विद्यार्थी, आयटी प्रोफेशनल्स आणि जीम करणारे तरुण आहेत.
लॉकडाऊननंतर बेरोजगार झालेले तरुण पैशांसाठी अंमली पदार्थ तस्करीत अडकले. तरुणांमधून सध्या मेफेड्रोनची मागणी आहे. मात्र, आम्ही कारवाई करुन तस्कर साखळी तोडत आहोत.
– अमोल झेंडे,पोलीस उपायुक्त, गुन्हे
मेफेड्रोनचे ग्राहक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि आयटी व्यावसायिक आहेत. आम्ही कोंढवा, बाणेर, बालेवाडी, विमाननगर, चंदननगर परिसरात अशा केसेस केल्या आहेत. या सर्व भागांत तरुणांची गर्दी असते कारण तेथे अनेक महाविद्यालये आहेत.
– विनायक गायकवाड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक.