पुणे –येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सुमारे 131 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. अवर सचिव दीपक केंद्रे यांनी हे अध्यादेश बुधवारी काढले आहेत.
या मनोरुग्णालयात पुरुष आणि महिला विभागातील इमारत पुनर्बांधणीचे काम करण्याचे अंदाजपत्रक आणि आराखडे सार्वजनिक बांधकाम विभागातील मेडिकल उपविभागाकडे सादर करण्यात आले होते. सन 2021-22 च्या दरसूचीनुसार हे अंदाजपत्रक आणि आराखडे मंजूर करण्यात आले आहेत.
या पुनर्बांधणीमध्ये पुरुष वॉर्डमध्ये एक हजार मनोरुग्णांची क्षमता असलेल्या तीन इमारती आणि महिला वॉर्डमध्ये 740 मनोरुग्णांची क्षमता असलेल्या दोन इमारती बांधण्याचा प्रस्ताव असून, 30 हजार 509 चौ. मी. क्षेत्रफळावर हे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. दरम्यान, या पुनर्विकासासाठी काही अटी आणि शर्तीही ठेवण्यात आल्या असून, त्यांचे पालन बंधनकारक आहे.
येथे इंग्रजांच्या काळातील इमारती आहेत, त्या खूप जुन्या झाल्या आहेत. येथील ड्रेनेज लाइनही जुनी झाली आहे. त्यामुळे त्याचे लिकेज, वीजेच्या तारांचे प्रश्न अशा अनेक समस्या होत्या. त्यामुळे त्याठिकाणी रुग्णांना ठेवता येत नाही. त्या इमारती रिकाम्या आहेत. आता नियोजित इमारतीमुळे वरील प्रश्न सुटू शकणार आहेत. याशिवाय सध्या अस्तित्त्वात आणि वापरात असलेल्या इमारती आणि नव्या नियोजित इमारती मिळून सध्या जी क्षमता आहे तेवढीच राहणार आहे.
– डॉ. लता पांढरे, अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय