पुणे – शहराला चोवीस तास समान पाणी देण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. पण, मजूर नसल्याने हे काम रखडले आहे. या मजुरांना आणण्यासाठी संबंधित कंपनी विमानाचे नियोजन करत असल्याची माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी मुख्यसभेत दिली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाण्यावरून प्रशासनास धारेवर धरल्यानंतर ही माहिती समोर आली.
पावसकर म्हणाले, “या योजनेअंतर्गत 82 पाणीटाक्या उभारण्यात येत आहेत. त्यातील 65 टाक्यांचे काम वेगाने सुरू आहे. टाक्यांचे काम पूर्ण होत आहे, तेथून पाणी वितरणासाठी सुमारे 150 किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकणे सुरू आहे. पण, त्यासाठी सध्या केवळ 40 टक्केच मजूर उपलब्ध असल्याने या कामावर त्याचा परिणाम होत आहे.
या योजनेअंतर्गत शहरात पाणी वितरणाचे सुमारे 141 झोन करण्यात येणार असून कामगार उपलब्ध झाल्यास डिसेंबर अखेरपर्यंत 50 झोनचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे काम करणाऱ्या कंपनीकडील बहुतांश कामगार पश्चिम बंगालमधील असून त्यांना परत आणण्यासाठी विमानाचे नियोजन करण्यात येत आहे.’