पुणे – टॅंकरचा आकडा रेकॉर्ड मोडणार?

मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात टॅंकर शंभरीजवळ : दोन महिन्यांत 150पर्यंत संख्या वाढण्याची भीती

पुणे – जिल्ह्यातील गाव, वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबांची तहान भागविण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून, मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात टॅंकरने शंभरीजवळचा आकडा गाठला आहे. उन्हाचा वाढता चटका आणि घशाला कोरड पडणाऱ्या गावांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अजून 150 हून अधिक टॅंकरची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे टॅंकरचा आकडा मागील पाच वर्षांतील विक्रम मोडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यात सध्या 94 टॅंकरने 55 गावे आणि 600 हून अधिक वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबांची तहान भागविली जात आहे. त्यामध्ये सर्वाधिक टॅंकरची संख्या बारामती आणि शिरूर तालुक्‍यात आहेत. पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ऑक्‍टोबरपासून पाणी टंचाईची समस्या उद्‌भवण्यास सुरूवात झाली. गतवर्षी (2017-18) जिल्ह्यातील 74 गावे आणि 649 वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ 87 टॅंकरची आवश्‍यकता भासली. गेल्या पाच वर्षातील टॅंकरची संख्या पाहली तर 2013-14 मध्ये सर्वाधिक 250 टॅंकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती. त्यामध्ये 174 गावे आणि 1 हजार 194 वाड्यांतील लाखो नागरिकांची तहान भागविण्यात आली.

बारामती, शिरूर, पुरंदर जुन्नर या तालुक्‍यातील कुटुंबांना पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर चालत जावे लागत आहे. ही पायपीट थांबावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ठिकठिकाणी ड्रम, टाक्‍या ठेवण्यात आल्या आहेत. परंतू, डोंगर भागातील वस्त्यांवर टॅंकर पोहचू शकत नाही, त्यांना पाण्यासाठी गावात यावे लागत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.