पुणे – आता निकालावेळीच मिळणार ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र

“अर्ज करा, पुन्हा या’ची कटकट थांबणार : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय

– व्यंकटेश भोळा

पुणे – परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी अर्ज करण्यापासून ते अगदी नोकरीच्या मुलाखतीवेळी पदवी शिक्षणातील सर्व वर्षांचा निकाल एकत्रित सारांश असणाऱ्या “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय टळण्याची चिन्हे आहेत.

गेल्या काही वर्षांत पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये जाण्याचा “ट्रेंड’ वाढत आहे. परदेशात शिक्षणासाठी आणि कंपन्यांमध्ये नोकरीसाठी “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे विद्यार्थी “ट्रान्सक्रिप्ट’साठी अर्ज करतात. अर्ज केल्यावर पंधरा दिवसांमध्ये प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र मुदतीत हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळत नाही. या प्रमाणपत्रासाठी सहा-सहा महिने प्रतीक्षा करावी लागते. एवढेच नव्हे, तर “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्यास विद्यार्थ्यांना परेदशातील उच्च शिक्षणाची संधी गेल्याची काही उदाहरणे आहेत.

त्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच हे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य संजय चाकणे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली. या समितीच्या तीन बैठका आतापर्यंत झाल्या आहेत. समितीने सर्व घटक व तांत्रिक कारणांचा आढावा घेतला असून, समितीची अखेरची बैठक दि. 5 एप्रिल रोजी होणार आहे. त्याच दिवशी समिती कुलगुरूंना आपला अहवाल सादर करणार आहे. विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र देण्याविषयी समितीने अनुकूलता दर्शविली आहे.

आता नव्या निर्णयानुसार “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क स्वतंत्र्यरीत्या भरावे लागणार नाही. परीक्षा अर्ज करतानाच विद्यार्थ्यांना “ट्रान्सक्रिप्ट’ हवे की नको, असा पर्याय देतील. त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांकडून त्या पद्धतीने शुल्क त्याचवेळी आकारले जाईल. परिणामी, या प्रमाणपत्रासाठी विद्यापीठाकडे अर्ज करा, त्यासाठी हेलमाटे मारा, असा प्रकार आता होणार नाही.

“ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्राचा आग्रह
गुणपत्रिकेवर केवळ मार्कांचा उल्लेख असतो. मात्र, विद्यार्थी कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाला, हे “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्रावर नमूद असते. त्यामुळे त्याचे इयर डाऊन झाले का? हे समजून येते. त्यावरून विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक गुणवत्ता लक्षात येते. त्यामुळे परदेशी विद्यापीठ व कंपन्यांकडून “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्रासाठी आग्रह असतो. त्यावरून नोकरीसाठी अथवा प्रवेशासाठी विचार केला जातो.

ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपासून अंमलबजावणी
समितीने “ट्रान्सक्रिप्ट’साठी शुल्कही कमी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच हे प्रमाणपत्र देण्यास काहीच अडचण येणार नसल्याच्या मतावर समिती ठाम आहे. नोकरी देणाऱ्या कंपन्यांना विद्यार्थ्यांचे “ट्रान्सक्रिप्ट’ डिजिटल पद्धतीने दिले जाणार आहे. त्यामुळे त्या प्रमाणपत्रावरून गैरप्रकार होण्याची शक्‍यता नाही. येत्या ऑक्‍टोबर-नोव्हेंबरच्या परीक्षांचा निकालासोबत “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने समितीतर्फे शिफारस केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.