पुणे (अंजली खमितकर)- करोना बाधितावर उपचार केल्यानंतर भरमसाठ बिलाचे ऑडिट महापालिका करते. पण, त्यात जादा आकारलेली रक्कम रुग्णालयाकडून परत तर दिलीच जात नाही. तर, उलट “रुग्णालयाने आमचे पैसे दिले,’ असे रुग्णाने लिहून द्यावे अशी मागणी होत आहे.
करोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आल्यानंतर बिलांचे ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी दिले. या बिलांचे जागेवर ऑडिट करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाची नेमणूक केली होती.
याशिवाय, महापालिकेमध्ये जर कोणी तक्रार घेऊन आले, तर तेथेही ऑडिट करून संबंधित रुग्णालयाला त्यासंबंधीचे पत्र पाठवून, संबंधित रुग्णाला रक्कम परत करण्याविषयी आदेश दिले जात होते. काही नामांकित रुग्णालयांवर यासंदर्भात कारवाईही करण्यात आली आहे.
मात्र, संबंधित रुग्णाला जादा बिल आकारणीचा परतावा देण्यासंदर्भातील पत्र रुग्णालयाला वारंवार पाठवून, पत्राद्वारे नोटीस देऊनही ते फरक पडत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आरोग्य विभागातून सतत केला जाणारा पाठपुरावा रोखण्यासाठी या रुग्णालयांनी आता नवी शक्कल लढवली असून, संबंधित तक्रारदार रुग्णाला आता “आमची बिलासंबंधी तक्रार नाही’ असे पत्र लिहून द्या असा तगादा लावला आहे.
दि.14 ऑगस्ट 2020 पासून ते 31 ऑगस्ट 2021 पर्यंत 345 तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्या सगळ्यांचे ऑडिट महापालिकेने केले. यामध्ये एकूण 31 कोटी 45 लाख 18 हजार 970 रुपयांची बिले आकारली होती. त्यातील जादा आकारलेली 5 कोटी 62 लाख 81 हजार 725 रुपयांची बिले आरोग्य विभागाने कमी केली आहेत. अनेक रुग्णांना त्याचा परतावाही मिळाला आहे.
अशा प्रकरणांचा पाठपुरावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे. हा ससेमिरा टाळण्यासाठीच काही रुग्णालयांनी हा प्रकार केला असावा. या संबंधित रुग्णालयांच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांना याबाबत विचारणा केली जाईल. तसेच असे प्रकार होऊ नयेत आणि रुग्णांना त्यांचे हक्काचे पैसे मिळतील.
– डॉ. आशिष भारती
आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका