– हिमांशू हरघडी उन्नत होत असलेल्या तंत्रज्ञानानं एक गोष्ट चांगली केलीय. मन आणि मेंदूतलं अंतर खूप कमी केलंय. म्हणजे, आपल्याला काहीतरी हवंय, असं आपल्या मनात येतं आणि मग ते मिळवण्यासाठी मेंदू चालवावा लागतो. मनाच्या सगळ्याच इच्छा, मागण्या पूर्ण होत नाहीत; परंतु मनात येण्यापूर्वीच इच्छा पूर्ण होऊ शकतील असा धनिकांचा एक वर्ग वाढतोय आणि त्यांना हात-पायच नव्हे तर मेंदूही कमीत कमी चालवावा लागेल, याची पुरेपूर काळजी नवतंत्रज्ञान घेतंय. हाकेला हजर असलेली “अलेक्सा’ घरोघर पोहोचू लागलीय. हवी ती माहिती देऊन पडेल ते काम ती करतेय. हातातला फोन आपल्यापेक्षा स्मार्ट झालाय. (किंवा आपण स्टुपिड झालोत.) काही दिवसांपूर्वी किमान गाडी चालवताना तरी डोकं चालवावं लागत होतं. जिथे जायचं ते ठिकाण शोधावं लागत होतं. पत्ता विचारण्याच्या निमित्तानं एखाद्या अनोळखी माणसाशी बोलणं व्हायचं. पण आता समोर मॅप असतो आणि किती मीटरवरून कुठल्या दिशेला वळायचं, हे गूगलबाई सांगत असतात. गाडीच्या काचा उघडण्यासाठी आता हात गोल-गोल फिरवावा लागत नाही. आता तर मनात आलं की काच उघडेल, मनात आलं की गाडीतला रेडिओ लागेल, मनात येईल तेव्हा स्टेशन बदलेल, अशा सोयी आल्यात म्हणे! “मनोवेगे’ धावणाऱ्या रथाचं वर्णन पुराणकथांमध्ये असायचं, तशीच “मन वाचणारी’ ही गाडी! जर्मनीत सध्या मोटारींच्या नवनवीन मॉडेल्सचा मोबिलिटी ऑटो शो चाललाय. मेंदूत सुरू असलेल्या हालचालींचं विश्लेषण करून स्वतःहून सगळी कामं करणारी कार तिथं झळकलीय. आपलं लक्ष कुठाय, याचा वेध घेऊन तीच आपली आज्ञा मानणारी ही गाडी आहे, असं सांगितलं जातंय! रस्त्याकडेच्या बारकडे लक्ष गेल्यावर चालकाच्या मेंदूत काही भलतेच विचार आले, तर ही गाडी काय करणार कोण जाणे! कमाल आहे ना तंत्रज्ञानाची? म्हणजे, तंत्रज्ञान एकीकडे चालकाला डोकंही चालवू देत नाही आणि दुसरीकडे चालकाच्या जागेसाठी सुरू असलेल्या परीक्षेत डोकं चालत नाही, त्यावेळीही तंत्रज्ञानच मदतीला धावून येतं. औरंगाबादमध्ये पोलीस दलातल्या वाहन चालकपदासाठी या परीक्षा झाल्या. खरं तर अपुरं संख्याबळ लक्षात घेऊन पोलीस दलात आता चालकविरहित गाड्याच दाखल व्हायला हव्यात. पण तो दिवस एवढ्या लवकर येईल असं वाटत नाही. त्यात जागा फक्त चोवीस आणि उमेदवार तीन हजारांपेक्षा जास्त! मग एखाद्या उमेदवाराला तंत्रज्ञानाचा आधार घेण्यासाठी डोकं चालवावं लागणारच. या पठ्ठ्यानं शर्टाच्या बटणाजवळ कॅमेरा बसवला होता. त्यातून प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून बाहेरच्या साथीदाराला धाडला. लपवलेल्या मोबाइलवरून उत्तरं मिळू लागली आणि ती ऐकण्यासाठी वापरला गेला न दिसणारा इयरफोन. अर्थात, तंत्रज्ञानाच्या मदतीनं होत असलेला हा गैरप्रकार तंत्रज्ञानानंच पकडला. परीक्षार्थी इतका “स्मार्ट’ असूनसुद्धा त्याची चुळबूळ संशयास्पद होती आणि सीसीटीव्हीत ती दिसल्यावर परीक्षकांनी त्याला पकडलं. यातल्या सूत्रधारालाही पोलिसांनी पकडलंय. हायटेक कॉपीसाठी हे मायक्रो डिव्हाइस पुरवण्याच्या मोबदल्यात त्यानं लाखो रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. कुठे चालक होण्यासाठी तंत्रज्ञान तर कुठे चालकच तंत्रज्ञान! तंत्रज्ञानच जगाचं “चालक’ बनू पाहतंय आणि “स्टिअरिंग’ कुठे वळणार हे कुणालाच ठाऊक नाही.