कोथरूड –कोथरूडमधील डेपोत कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. ओला आणि सुका कचरा येथे वेगळा केला जातो. ओला कचऱ्यातून सुटणारे पाणी डेपोच्या भिंतीतून बाहेर येत असून हे पाणी संपूर्ण रस्त्यावर पसरत आहे. याच ठिकाणी बसस्टॉप असल्याने प्रवाशांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाण्याचे मोठे तळे साचते, अशा दूषित पाण्यामुळे त्वचेच्या आजारासह आरोग्याच्या अन्य समस्य उद्भवण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यापूर्वी याची दुरूस्ती करणे गरजेचे आहे.
कोथरूड येथील “कचरा डेपो’च्या समस्येकडे प्रशासनाचे तसेच स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष आहे.
पौड रोडवरील कचरा डेपो बसस्टॉप येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे, त्यातच कचरा डेपोतील घाण पाणीही रस्त्यावर सोडल्यामुळे हा परिसर विद्रुप झाला आहे. या परिसरात फिरताना अधिकारी आणि कर्मचारी यांच्याही हे निदर्शनास येते. मात्र, जोपर्यंत कोणी तक्रारी करीत नाही, तोपर्यंत “चलता हे चलने दो’, अशी भावना असल्याकारणाने हा प्रश्न कायमस्वरूपी सुटत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कचरा डेपो बसस्टॉपच्या ठिकाणी रस्त्यावर नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. कचरा संकलन वेळेत होत नसल्याने कचऱ्याच्या गाड्यांची लाइन रस्त्यावर असते. त्यामुळे दुर्गंधी पसरते. याठिकाणी पाणी पडल्यावर किंवा पावसाळ्यामध्ये येथील रस्ता निसरडा होतो आणि अपघातांना निमंत्रण मिळते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये निम्मा रस्ता बंद केला जातो. येथील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. डेपोतून येणारे घाण पाणी बंद करण्यात यावे. – रमेश उभे, स्थानिक नागरिक