पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सतत चर्चेत असते. अशातच विद्यापीठातील प्राध्यापकांचे अन्य विद्यापीठात कुलगुरू म्हणून निवड होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याबाबतीत पुणे विद्यापीठ हे कुलगुरू निवडीच्या केंद्रस्थानी राहिले असून, हीच पुणे विद्यापीठाची नव्याने ओळख बनत आहे.
मूळचे पुण्यातील असलेले व पुणे विद्यापीठात विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा. मनोहर चासकर यांची गेल्याच आठवड्यात नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली आहे. आतापर्यंत पुणे विद्यापीठातील १७ प्राध्यापकांची अन्य विद्यापीठात कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे.
राज्यातील बहुतांश सार्वजनिक विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तथापि, कुलगुरू निवडीसाठी अंतिम पाच जणांची निवड केली जाते. त्यात पुणे विद्यापीठातील प्राध्यापकच सर्वात पुढे असतात. पाचपैकी दोन- तीन उमेदवार पुणे विद्यापीठामधील प्राध्यापक असतात, हेच चित्र दिसून आले. नुकतेच नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी पाचपैकी तीन प्राध्यापक पुणे विद्यापीठातील होते.
त्यातील प्रा. मनोहर चासकर यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यांनी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यापूर्वी पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून कार्य करीत असलेले प्रा. संजीव सोनवणे यांची मे महिन्यात मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड झाली आहे.
अन्य विद्यापीठांत कुलगुरूपदी झालेली निवड
जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून डॉ. शांतिश्री पंडित, प्रा. एन. जे. पवार, डॉ. एम. जी. बले, डॉ. डी. एन. धनागरे, प्रा. पंडित विद्यासागर, प्रा. आर. एस. माळी, डॉ. एस. एफ. पाटील, साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. बी. ए. चोपडे, प्रा. दिलीप उके, प्रा. राम ताकवले, डॉ. डी. एन. देवबागकर, प्रा. टी. एस. एन. शास्त्री, डॉ. उत्तम भोईटे, डाॅ. संजीव सोनवणे, प्रा. मनोहर चासकर.
विद्यापीठातच प्राध्यापक ते कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत असताना अनेक प्राध्यापकांनी पुणे विद्यापीठात कुलगुरू म्हणून कारकीर्द भूषविली आहे. डॉ. राम ताकवले, डॉ. वि. ग. भिडे, डॉ. श्रीधर गुप्ते, डॉ. अरुण निगवेकर, डॉ. अशोक कोळस्कर. डॉ. वासदेव गाडे, डाॅ. नितीन करमळकर यांचा समावेश आहे. गेल्या जून महिन्यात विद्यापीठातील प्रा. सुरेश गोसावी यांचीही पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे. विद्यापीठातील प्राध्यापक पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.