पुणे – शहरात नामांकित वाहतूक कंपन्यांकडून नियमांचे पालन न करता दुचाकी प्रवासी (टॅक्सी) सेवा देण्यात येत असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. या सेवेमुळे नियमांचे उल्लंघन होत असून, प्रवासी सुरक्षेच्या अनुषंगाने उचित नाही. त्यामुळे आता शहरात अनधिकृतरित्या सेवा पुरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कार्यालयाने दिला आहे.
टॅक्सी सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नोंद मोटार वाहन कायद्यांतर्गत भाडोत्री परिवहन संवर्गात नोंद असणे आवश्यक असते. यासह कंपनी नोंद करताना देखील अटी, शर्तींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरच व्यवसाय सुरू करण्याची मुभा असते. सध्या कंपन्यांकडून संकेतस्थळ किंवा ऍप्लिकेशनच्या माध्यमातून सेवा देण्यात येत आहे. यासह सेवा पुरविणारे चालक विना हेल्मेट प्रवास करत आहेत. यामुळे वाहतूक नियमांचे देखील उल्लंघन होत असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
संबंधित कंपनी किंवा ऍपद्वारे अनधिकृतरित्या देण्यात येणाऱ्या सुविधेचा वापर करू नये. यासह दुचाकी देखील या प्रकारच्या सेवेसाठी उपलब्ध करून देऊ नये. अन्यथा मोटार वाहन कायद्यानुसार विनापरवाना प्रवाशांची वाहतूक करणे, या गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे “आरटीओ’कडून सांगण्यात आले.