पुणे – स्वाइन फ्लूचे आणखी दोन रुग्ण आढळले

कडक उन्हाळा सुरू होऊनही साथ आटोक्‍यात येईना

पुणे – स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास आरोग्य विभागाला अजून यश आलेले नसल्याचे दिसून येत आहे. कडक उन्हाळा सुरू होऊनही स्वाइन फ्लू कमी होत नसल्यामुळे आरोग्य विभागही हतबल झाला असून, शनिवारी झालेल्या तपासणीमध्ये दोन व्यक्तींना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, शहरातील विविध रुग्णालयांत 6 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मागील आठ दिवसांपासून शहरातील कमाल तापमानाने यंदाच्या हंगामातील उच्चांक गाठला आहे. उन्हाचा चटका सोसेनासा झाला आहे. मात्र, एवढा कडका उन्हाळा असूनही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. दर आठवड्याला साधारण आठ ते दहा रुग्ण नव्याने आढळून येत आहे. दरम्यान, दिवसभरात 3 हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 27 संशयितांना टॅमीफ्लूचे औषध देऊन घरी सोडण्यात आले. तर स्वाइन फ्लूची लागण झालेल्या दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्यस्थितीत शहरात स्वाइन फ्लूचे 11 रुग्ण उपचार घेत असून, 5 रुग्ण वॉर्डमध्ये तर 6 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यंत (1 जानेवारीपासून) 2 लाख 50 हजार 87 व्यक्तींच्या तपासणीतून 103 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 3 हजार 321 व्यक्तींना टॅमीफ्लूची औषधे देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.