पुणे – महापालिकेच्या बालेवाडी येथील जकात नाक्याच्या जागेवर एकात्मिक वाहतूक सुधारणाअंतर्गत महापालिकेकडून विकसित केले जाणारे मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब आता पीपीपी (पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप) अंतर्गत विकसित केले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासक विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हा हब स्मार्ट सिटीकडून विकसित करण्यात येणार होता. त्यासाठी 2018 मध्ये महापालिकेच्या मुख्यसभेने मान्यताही दिलेली होती. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये हे हब महापालिकेनेच विकसित करावे, असा ठराव मुख्यसभेत मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने हे काम शासनाची मान्यता मिळेल या भरवशावर पीपीपी तत्त्वावर करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचा प्रस्ताव स्थायीत ठेवण्यात आला आहे.
महापालिकेस नवीन जकात उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 1999 मध्ये ही जागा देण्यात आली होती. त्यानंतर जकात रद्द झाल्यावर ही जागा रिकामी असल्याने तसेच स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू झाल्याने स्मार्ट सिटीने या ठिकाणी शहरातील वाहतूक सुधारणाअंतर्गत एकाच जागेवर पीएमपी, खासगी प्रवासी वाहने, एसटी तसेच मेट्रोची सुविधा असावी या उद्देशाने मल्टी मॉडेल हब प्रस्तावित करत पालिकेस प्रस्ताव पाठविला होता. पालिकेने त्यास मान्यताही देत ही जागा स्मार्ट सिटीकडे हस्तांतरित केली. त्यानंतर यातील काही जागा हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी देण्यात आली असून उर्वरीत जागेवर ट्रान्स्पोर्ट हब प्रस्तावित होते. मात्र, आता ते महापालिकाच साकारणार असून या प्रकल्पासाठीचा खर्च लक्षात घेता पालिका ते खासगी सहभागातून उभारणार आहे.