पुणे – महापालिकेकडून शहरात गेल्या वर्षभरात व्हीआयपी टाॅयलेटच्या नावाखाली तब्बल १८ लाख रुपये खर्चाच्या उधळपट्टीचा घाट घालण्यात आला आहे. हे एक प्रकारचे फिरते मोबाईल टाॅयलेट असून, या टाॅयलेटचा खर्च प्रतिदिन तब्बल २५ हजार रुपयांचा आहे. गेल्या वर्षभरात ७४ वेळा हे टाॅयलेट वापरण्यात आले असून, त्याचे बिल देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे.
याशिवाय त्याचा वापर पालखी, गणेशोत्सव, बुक फेअर, वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी, तसेच बचत बाजारांसाठी केला असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात ज्या बचत बाजारांच्या ठिकाणी ही मोबाईल टाॅयलेट किती दिवस ठेवण्यात आली याची प्रशासनाने दिलेली माहिती प्रत्यक्षातील स्थिती यात तफावत आहे. त्यामुळे ही टाॅयलेट नक्की वापरली का, तसेच गरज नसतानाही ती जादा दिवस का ठेवण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिकेकडून शहरात गर्दीच्या ठिकाणी पोर्टेबल टाॅयलेट वापरली जातात. या टाॅयलेटचा दर प्रतिदिन ११०० रुपये आहे. पालखी, गणेशोत्सव, तसेच इतर गर्दीच्या वेळी नागरिक अथवा संस्थांच्या मागणीनुसार पैसे आकारून महापालिका ती पुरविते. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्थायी समितीत गेल्या वर्षभरात पालखी, गणेशोत्सव, बुक फेस्टिवल, तसेच पालिकेच्या बचत बाजारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोबाईल टाॅयलेट, तसेच व्हीआयपी टाॅयलेटच्या बिलांचा प्रस्ताव ठेवला आहे. यात दिवाळी बचत बाजार, बुक फेस्टिवलसाठी वापरण्यात आलेल्या व्हीआयपी टाॅयलेटचा खर्च तब्बल १८ लाख ५० हजार दाखविण्यात आला आहे.
टाॅयलेट वापरलेच नाहीत?
या प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने दिवाळीत भरविलेल्या बचत बाजारांच्या तीन ठिकाणी प्रत्येकी ७ दिवस दोन व्हीआयपी टाॅयलेट उपलब्ध करून दिले होते, तसेच पुणे बुक फेस्टिवलसाठी सप महाविद्यालय मैदानावर २ दिवस आणि फर्गसन महाविद्यालय मैदानावर १० दिवस हे टाॅॅयलेट उपलब्ध करून दिले होते.
यात सर्वाधिक वापर पालिकेच्या दिवाळी बचत बाजाराला झालेला असल्याने याबाबत समाज विकास विभागाकडे चौकशी केली असता, व्हीआयपी टाॅयलेट केवळ औध- बाणेर येथेच दिल्याचे सांगण्यात आले, तसेच पालिकेचा बचत बाजार पाचच दिवस असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावात कात्रज डेअरी आणि सिंहगड रस्ता येथे सात दिवस प्रत्येकी २ व्हीआयपी टाॅयलेट व्हाॅन ठेवल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे हा खर्च नक्की झाला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
असे असते व्हीआयपी टाॅयलेट
हे टाॅयलेट एका व्हॅनमध्ये तयार करण्यात आलेले आहे. त्यात एकच सीट असते. मात्र, आतमध्ये पंचतारांकीत सुविधा असतात. व्हॅनमध्ये वातानुकूलित यंत्रणेसह २४ तास पाण्याची सुविधा असते.