पुणे – “आरटीई’ प्रवेशासाठी आज दुसरी लॉटरी काढणार

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्‍क कायद्याअंतर्गतच्या (आरटीई) 25 टक्‍के प्रवेशासाठी दुसरी राज्यस्तरीय लॉटरी शनिवारी (दि.15) काढण्यात येणार आहे. या लॉटरीची उत्सुकता पालकांना लागली आहे.

खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. या शाळांमधील प्रवेशासाठी पालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. राज्यातील 9 हजार 195 शाळामध्ये 1 लाख 16 हजार 793 जागांसाठी प्रवेश दर्शविण्यात आले आहेत. या जागांसाठी एकूण 2 लाख 44 हजार 90 ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. प्रवेशासाठी 8 एप्रिल रोजी पहिली राज्यस्तरीय लॉटरीकाढून पहिली फेरी राबविण्यात आली. यात 67 हजार 716 जागा प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यातील 47 हजार 35 जागांवर प्रवेश निश्‍चित झाले असून उर्वरित 20 हजार 681 प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्या आहेत.

अर्जातील गुगल लोकेशनसह इतर माहितीत दुरुस्ती करण्यासाठी पालकांना दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. या कालावधीत बहुसंख्य पालकांनी पडताळणी समितीकडे जावून अर्जातील माहितीत दुरुस्ती करून घेतली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रवेशासाठी दुसरी लॉटरी काढण्यात येणार आहे. मात्र यासाठी कोणताही जाहीर कार्यक्रम घेण्यात येणार नाही.

एनआयसी मार्फत “आरटीई’ पोर्टलवरील डेटा रन करून सकाळी 10 वा. ही लॉटरी निघणार आहे. प्रवेशाची लॉटरी लागलेल्या पालकांना नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर “एसएमएस’ पाठविण्यात येणार आहेत. “एसएमएस’ न आल्यास वेबसाईटवर ऍप्लिकेशन वाईज डिटेल्समध्ये अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली आहे का ते पाहता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.