पुणे – दानशुरांमुळेच ससून रुग्णालयाचा कायापालट

डॉ. अजय चंदनवाले : यकृत प्रत्यारोपण केंद्राचे उद्‌घाटन

पुणे – ससून रुग्णालयाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. रुग्णालयाला अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवांचे केंद्र बनविण्यासाठी छाब्रिया कुटुंबासारखे अनेक दानशूर लोक पुढे आले. त्यामुळेच रूग्णालयाचा कायापालट होवू शकला. डॉक्‍टर, स्टाफ आणि परिचारिका यांच्यासह आपण सर्वांनी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची मनोभावे आणि प्रामाणिक सेवा करुन दात्यांनी दिलेल्या पैशाला योग्य न्याय द्यावा, असे मत मुंबईतील जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केले.

ससून रुग्णालयात उभारण्यात आलेल्या यकृत प्रत्यारोपण केंद्राचे उद्‌घाटन प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. आर. एस. वाडिया तसेच यकृत प्रत्यारोपण झालेल्या पहिल्या दोन रुग्णांच्या हस्ते झाले. फिनोलेक्‍स इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रल्हाद पी. छाब्रिया यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त फिनोलेक्‍स व मुकुल माधव फाउंडेशनने केलेल्या अर्थसहाय्यातून हे केंद्र उभारण्यात आले आहे. यावेळी फिनोलेक्‍सचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया, मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु प्रकाश छाब्रिया, अरुणा कटारा, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. शीतल धडफळे, डॉ. कमलेश बोकील, डॉ. संजीव ठाकूर उपस्थित होते.

डॉ. वाडिया म्हणाले, ससूनमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला बरा होऊन घरी जाण्याची आशा असते. येथे कार्यरत डॉक्‍टर आणि सर्वच स्टाफने रुग्णाला तो विश्‍वास दिला पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला ससून रुग्णालय आपल्यासाठी आहे, असे वाटायला पाहिजे. डॉ. प्रदीप नणंदकर म्हणाले, शासकीय रुग्णालयांकडे जाण्यासाठी रुग्ण फारसे इच्छुक नसतात. परंतु, गेल्या काही वर्षात ससूनने आपल्या आरोग्यसेवेत आमूलाग्र बदल केल्यामुळे रूग्णांची संख्याही वाढली आहे. प्रकाश छाब्रिया म्हणाले, सामान्य रुग्णांसाठी ससूनमधील डॉक्‍टर आणि स्टाफ देवाप्रमाणे आहेत. त्यांची ही भावना लक्षात घेऊन येथील आरोग्य सुविधा उच्च दर्जाच्या व्हाव्यात, या प्रेरणेने आम्ही काम करीत आहोत.

यावेळी रितु छाब्रिया, अरुणा कटारा, डॉ. कमलेश बोकील आणि डॉ. शीतल धडफळे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. ठाकूर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. नेहा सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन तर डॉ. पठाण यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.