पुणे – महापालिकांच्या निवडणुकांसाठी यंदा तीन सदस्यांचे प्रभाग करावयाचे आहेत. मात्र, सर्व प्रभाग तीन सदस्यांचे करणे शक्य नसेल तेथे एक भाग दोन अथवा चार सदस्यांचा राहील. दोन अथवा चार सदस्यांचा प्रभाग हा भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन योग्य त्या ठिकाणी ठेवता येईल.
महापालिकांची ही व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना वेळेवर अंतिम करणे सुकर होण्यासाठी प्रभाग रचनेची कार्यवाही तत्काळ सुरू करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कच्चा प्रारूप प्रभाग रचना तयार करावीत, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदीनुसार महानगरपालिकेची मुदत संपण्यापूर्वी तिची सार्वत्रिक निवडणूक घेणे बंधनकारक आहे. शासनाने दि. 30 सप्टेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशान्वये महानगरपालिकांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. त्यामुळे शक्यतो तीन सदस्यांचे प्रभाग करावयाचे आहेत.
निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार नव्याने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीनंतर अधिसूचनान्वये हद्दीत झालेले बदल (क्षेत्र समाविष्ट करणे अथवा वगळणे), विकासाच्या योजनांमुळे झालेले भौगोलिक बदल विचारात घेण्यात यावे. ही सर्व कार्यवाही निवडणुका मुदत संपण्यापूर्वी पार पाडणे शक्य व्हावे, यासाठी सध्या प्रारूप रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा.
अशी असेल संभाव्य प्रभाग रचना
पुणे मनपा
एकूण सदस्य 166
एकूण प्रभाग 55
तीन सदस्यीय प्रभाग 54
चार सदस्यीय प्रभाग 1
पिंपरी-चिंचवड मनपा
एकूण सदस्य 128
एकूण प्रभाग 43
तीन सदस्यीय प्रभाग 42
दोन सदस्यीय प्रभाग 1
- अशा आहेत प्रमुख सूचना
- महानगरपालिका हद्दीची एकूण लोकसंख्या भागिले महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या गुणिले त्या प्रभागातील सदस्यांची संख्या या सूत्रानुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या निश्चित करावी.
- प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या 10 टक्के कमी किंवा 10 टक्के जास्त या मर्यादेत प्रभागाची लोकसंख्या ठेवता येईल.
- प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेली लोकसंख्येची अलिकडची आकडेवारी म्हणजेच सन 2011 ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे.