सागर येवले
पुणे – करोना लसीकरण झाल्यानंतर त्यातून निर्माण होणारी प्रतिकारशक्ती किती काळ टिकते याचा अभ्यास पुण्यातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था करत आहेत.
रोगप्रतिकारकशक्तीचा तपशील गोळा करणाऱ्या “व्हिजन’ ( व्हॅक्सिन इम्युनॉलॉजी स्टडीज-इंडियन आउटबर्क-रिस्पॉन्स)हा प्लॅटफॉर्ममार्फत देशांत होणाऱ्या लसीकरण मोहिमेचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यात प्रायोगिक तत्त्वावर पुणे, बंगळुरू आणि वेल्लोर येथे ही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
हा कार्यक्रम हिंदुस्तान लिव्हरच्या सीएसआर निधीतून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा कालावधी दीड ते दोन वर्षांचा असेल. या तीन शहरात 800 हून अधिक जणांचा परिक्षणात सहभाग असेल.
पुण्यात आयसर, एनसीसीएस
आणि सीएसआयआर-एनसीएलयांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील भागीदार केईएम हॉस्पिटल आणि सिंबायोसिस विद्यापीठ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यात सहभागी होणार आहे. एनसीबीएस,इन्सटेम यांसह वैद्यकीय भागीदार म्हणून सेंट जॉन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि बिशप हॉस्पिटल आणि वेल्लोरमधील सीएमसी यात सहभागी होणार आहेत. कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्डचा डोस दिल्यानंतर त्याच्या परिणामकारकता किती काळ राहते तसेच त्याचे होणारे परिणाम तपासणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती डॉ. अनु रघूनाथन यांनी सांगितले.
लसीचे दोन्ही डोस दिल्यानंतर व्यक्तीच्या शरीरामध्ये किती ऍन्टिबॉडीज वाढतात आणि किती दिवस टिकतात याबाबतचे संशोधन सुरू करण्यात येणार आहे. पुणे नॉलेज क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने हे संशोधन करणार असून, त्यामध्ये 200 जणांचा अभ्यास करण्यात येणार आहे. लस दिल्यानंतर पुढील सहा महिन्यांचा हा अभ्यास असून, त्यामध्ये सहा वेळा नमुने घेऊन त्याची चाचणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये ऍन्टिबॉडी किती वाढतात, लस घेतल्यानंतर काय इन्फेक्शन होते, तिसरा बूस्टर डोस द्यायचा असेल तर तो कधी आणि किती दिवसांनी द्यायचा हे सर्व या संशोधनातून समोर येणार आहे. त्याचबरोबर लस घेतल्यानंतर किती जणांना करोनाची बाधा होते, यासह विविध पैलूंचे यातून संशोधन करण्यात येणार आहे.
– डॉ. विजय नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी,
सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र