पुणे – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीतील पोषण आहाराचा लाभ “डीबीटी’द्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे आधार लिंक बॅंक खाते नसल्यास पालकांचे किंवा संयुक्त नावाने असलेल्या खात्यात रक्कम जमा करण्याचा पर्याय प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने काढला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष कल्याणकारी उपाय म्हणून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या आहार खर्चाच्या रकमेइतके आर्थिक साह्य थेट लाभ हस्तांतरणद्वारे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात हस्तांतरण करण्याचे नियोजन आहे. शासनाकडून तुटपुंजी रक्कम मिळणार असून त्यापेक्षाही बॅंक खाते उघडण्यासाठी जास्त खर्च येणार असल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांचे अद्याप बॅंक खाते उघडण्यातच आलेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने नियमावलीत काही बदल केले आहेत.
दहा वर्षांखालील विद्यार्थ्यांची आधार नोंद आले पण बॅंक खाते नाही अशा विद्यार्थ्यांचा लाभ त्यांच्या पालकांच्या खात्यातही जमा करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी नाही त्यांची आधार नोंदणी झाल्यानंतरच त्यांच्या पालक किंवा संयुक्त खात्यात पैसे जमा होणार आहे.
बॅंक सुविधा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी आधार नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या किंवा संयुक्त पोस्ट ऑफिस खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. राष्ट्रीयीकृत बॅंका उपलब्ध नसल्यास स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक खात्याचा उपयोग करता येणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याची माहिती संकलित करून ठेवण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात, असे आदेशही टेमकर यांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.