पुणे – एआयएसएसएमएस आयओआयटी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यात विविध क्षेत्रात काम करणार्या माजी विद्यार्थ्यानी हजेरी लावली. मेळाव्यादरम्यान माजी विद्यार्थ्यानी विद्यमान विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादातून त्यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीतील नवनवीन संधी, मुलाखतीची तयारी, मार्केटिंगची गरज, वित्तीय व्यवस्थापन, उच्चशिक्षणाच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.
संस्थेचे मानद सहसचिव सुरेश शिंदे, संस्थेचे सदस्य निखिल खणसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. माने, आयक्यूएसी प्रमुख आणि सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये होणारे वेगवान बदल, संशोधन व विकास, प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी,चर्चा,समुपदेशन आदी विषयांवर माजी विद्यार्थ्यानी सहकार्य करावे तसेच महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उंचवण्यास मदत करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. पी.बी. माने यांनी केले.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी पुन्हा संपर्क साधण्याची आणि जुन्या मित्रांना भेटण्याच्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी या स्नेहमेळाव्याचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.बी.माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. माजी विद्यार्थी संघटना समिती प्रमुख प्रा. मीनल झोपे व विभागीय सदस्य प्रगती महाले, मिलिंद गाजरे, ऋतुजा गाडगीळ, डॉ. बद्री महापात्रा यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.