पुणे : गजबजलेल्या टिळक चौकातील छत्रपती संभाजी महाराज पोलीस चौकीच्या मागील बाजूस नदीपात्रात उभारलेले वादग्रस्त होर्डिंग अखेर जमीनदोस्त करण्यात आले आहे. महापालिकेच्या जागेत हे होर्डिंग उभारण्यात आले होते. त्या वेळी अनधिकृत वृक्षतोड, नदीपात्रात राडारोडा टाकणे, तीन होर्डिंगची परवानगी घेऊन एक मोठे होर्डिंग उभारणे, अशा प्रकारे नियमभंग करण्यात आला होता.
त्यामुळे महापालिकेकडे याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पालिकेने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित होर्डिंग मालकाला दंड बजावला होता, तसेच परवानगी देणार्या क्षेत्रीय कार्यालयाच्या तीन कर्मचार्यांनाही निलंबित करून हे होर्डिंग निष्कासित करण्याची नोटीस संबंधित मालकास बजाविली होती.
त्यानंतर मालकाने न्यायालयात पालिकेच्या नोटीस विरोधात दावा दाखल करत पालिकेच्या नोटीसला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयात महापालिकेच्या जागेत होर्डिंग उभारण्यात आल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने स्थगितीला नकार दिला होता. त्यानंतर पालिकेने लगेच हे होर्डिंग काढून टाकले आहे.
विशेष म्हणजे क्षेत्रीय कार्यालयाकडून न्यायालयात सादर करण्यासाठी योग्य कागदपत्रे उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात होती. महापालिका आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी फोन करून कान टोचल्यानंतर मंगळवारी काही कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली हाेती. त्यामुळे न्यायालयाने स्थगितीस नकार दिला होता.