नाकाबंदी वेळीची घटना; वेगळाच प्रकार आला समोर
पुणे – कोंढवा येथे नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एक काळ्या काचा असलेल्या एसयूव्ही मोटारीला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी दामटवली. त्यावेळी हवेत गोळीबार झाल्याचा आवाज झाला. ही बाब गांभीर्याने घेत पुणे पोलिसांनी रात्रभर पुणे शहर पिंजून काढले. पहाटेच्या सुमारास मंतरवाडी फाटा येथे एका गल्लीत ती मोटार आढळली. पोलिसांनी मोटारीची पाहणी केल्यावर वेगळाच प्रकार समोर आला. याप्रकरणी पाच तरुणांना नोटीस बजावण्यात आली आहे.
कोंढवा पोलिसांनी ज्योती हॉटेल चौकात नाकाबंदी केली होती. पहाटे एकच्या सुमारास काळ्या काचा असलेली एसयूव्ही मोटार आली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती वेगाने निघून गेली. यामुळे एका वॉर्डनने काठीने मारल्याने मोटारीची काच फुटली. त्यावेळी गोळीबार झाल्यासारखा आवाज आला.
नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले. दरम्यान, मोटार गाडी उंड्रीकडून मंतरवाडी फाट्याकडे गेल्याची माहिती मिळाली. पहाटे ती मोटार एका गल्लीत सापडली. पोलिसांनी माहिती घेऊन पाच तरुणांना ताब्यात घेतले मोटारीची तपासणी केली असता, मोटारीच्या सायलेंन्सरचा आवाज “गोळीबार’ झाल्यासारखा येत असल्याचे समजले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
तलाठी झाल्याची पार्टी…
एसयूव्ही मोटारातील एक तरुण तलाठ्याची परीक्षा पास झाला होता, त्याची पार्टी करून पाचही तरुण मद्यपान करून निघाले होते. नाकाबंदी असल्याने त्यांनी पळ काढला होता. त्याचवेळी सायलेन्सरचा “गोळीबार’ सारखा आवाज झाला. पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन सोडून दिले आहे.