पुणे: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण पुण्यात २३ जानेवारी ते २ फेब्रुबारीपर्यंत करण्यात आले. यासाठी महापालिकेने नेमलेल्या ३ हजार ७७ प्रगणकांनी शहरात १४ लाख ३० हजार ०६२ घरांना भेटी दिल्या आहेत. मात्र, त्यातील तब्बल ३ लाख ९३ हजार घरे बंद होती. शिवाय १ लाख ८४ हजार ७०१ घरांमध्ये या सर्वेक्षणास नकार देण्यात आला असल्याने शहरात प्रत्यक्षात ८ लाख ५१ हजार ५४२ कुटुंबांचीच माहिती संकलित झाली असल्याचे समोर आले आहे.
प्रशासनाकडून शासनास पाठविण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. २६ ते २८ जानेवारी सलग सुट्टया आल्याने, तसेच महिनाअखेरमुळे अनेक पुणेकर फिरण्यासाठी घराबाहेर पडल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वेक्षणाच्या तारखा निश्चित करताना मोठ्या शहरांसाठी प्रशासकीय पातळीवर या सुट्टयांचा, तसेच तारखांचा विचार न केल्याने त्याचा फटका सर्वेक्षण मोहिमेला बसल्याची चर्चा आहे.
प्रत्यक्षात चार दिवसच सर्वेक्षण
मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण २३ जानेवारीला सुरू करण्यात आले. हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत केले जाणार होते. मात्र, पहिल्याच दिवशी सर्वेक्षणाचा सर्व्हर डाऊन झाला. त्यानंतर दुसर्या दिवशी दुपारपर्यंत तो डाऊनच होता. त्यामुळे पहिले दोन दिवस रडतखडत सर्वेक्षणाचे काम झाले. त्यानंतर २६ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत सलग सुट्टया आल्या. त्यामुळे अनेक घरे बंद असल्याने प्रगणकांची चांगलीच कोंडी झाली. प्रत्यक्षात सर्वेक्षणाच्या कामाला २९ जानेवारीपासून गती आली, तर त्यानंतर शेवटचे पाचच दिवस सर्वेक्षणाचे काम पूर्ण क्षमतेने झाले. पुण्यात प्रगणकांनी भेट दिलेल्या घरांपैकी सुमारे ५ लाख ७८ हजार ५२० घरांचे सर्वेक्षणच झालेले नाही.
असे आहे पुण्यातील चित्र
महापालिकेला अपेक्षित घरे – १३ लाख ३१ हजार ७८९
एकूण भेटी – १४ लाख ३० हजार ०६२ घरे
सर्वेक्षण नाकारले – १ लाख ८४ हजार ७०१
बंद असलेली घरे – ३ लाख ९३ हजार ८१९