पुणे – जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मागील दोन महिन्यांपासून सुपर स्प्रेडर सर्वेक्षण सुरू आहे. यात मागील दहा दिवसांत 20 हजार 361 जणांच्या सर्वेक्षणामध्ये 192 बाधित सापडले. प्रत्येक आठवड्याला सरासरी एक ते दीड हजाराच्या असपास हे बाधित सापडत आहेत. मात्र, सततच्या
सर्वेक्षणामुळे ही संख्या आता घटत आहे, असे जिल्हा आरोग्य विभागाने म्हटले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून करोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, व्यापारी म्हणजे ज्या व्यक्तींचा अनेक व्यक्तींबरोबर संपर्कात येते, अशी व्यक्ती ही सुपर स्प्रेडर ठरते. त्यामुळे प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची भीती अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने या सुपर स्प्रेडर सर्वेक्षणाला सुरुवात झाली.
साधारण 12 ते 26 मेच्या सर्वेक्षणात 27 हजार 663 सुपर स्प्रेडर सर्वेक्षणातून 569 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आता जून महिन्यात 8 ते 16 जूनदरम्यानच्या सर्वेक्षणात 192 सुपर स्प्रेडर सापडले. मागील महिन्याच्या तुलनेत बाधित सापडण्याचे प्रमाण कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.