पुणे : पुणे शहर पोलीस दलातील एका सहायक आयुक्तांनी इमारतीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा पोलीस दलात दबक्या आवाजात सुरू आहे. गंभीर गुन्ह्यात वेळेत दोषारोपपत्र न दाखल्याने आरोपींना जामीन मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहायक आयुक्तांची कानउघाडणी केली होती. त्यामुळे सदनिकेतील गॅलरीतून उडी मारून सहायक आयुक्तांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.
मात्र, असे काही घडले नसून, गॅलरीत पाय घसरून अपघात घडल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मध्यभागात टोळीयुद्धातून तीन महिन्यांपूर्वी एका तरुणाचा खून झाला होता. या गुन्ह्यात सराईतासह साथीदारांविरुद्ध न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नव्हते. परिमंडळ एकमधील एका सहायक पोलीस आयुक्तांकडे गंभीर गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला होता. दोषारोपपत्र वेळेत दाखल न झाल्याने सराईतासह साथीदारांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहायक आयुक्तांची कानउघाडणी केली होती. सहायक आयुक्त सोमवारी गॅलरीतून तोल जाऊन पडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.