पुणे: औषधी रोपांच्या लागवडीतून यशस्वी उद्योजक

27 वर्षीय सुनील पवारचे यश; पुणे विद्यापीठाने दिले प्रशिक्षण

पुणे  – सुरुवातीला काही मित्रांसोबत पूजा पत्री, समिधा विकणाऱ्या एका आदिवासी तरुणाने औषधी वनस्पती लागवडीच्या प्रशिक्षणाच्या आधारे व्यवसाय सुरू केला आहे. आज यामुळे आदिवासी भागातील 1 हजार 800 लोकांना रोजगारही प्राप्त झाला आहे. सुनील पवार हे मूळचे ठाणे जिल्ह्यातील असून, त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे.

सुरुवातीला छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्यानंतर त्यांनी जंगलातून पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पती गोळा करण्याचे काम हाती घेतले. मात्र, एका कार्यक्रमात त्यांना आयुष मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन केलेल्या पश्‍चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राविषयी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या विभागातून औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी, याचे प्रशिक्षण घेतले.

करोना काळ असल्याने त्याचकाळात गुळवेलला मोठी मागणी होती. त्याचवेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही गुळवेल प्रकल्प हाती घेतला होता. त्यावर्षी पवार यांनी 34 टन गुळवेलची विक्री केली, तर यंदाचे वर्ष पूर्ण होण्याआधीच जानेवारी ते जून महिन्यांत 100 टन गुळवेलची निर्मिती झाली आहे.

गुळवेलचं उत्पादन कसं घ्यावं, त्याची साठवणूक कशी करावी तसेच त्याची विक्री कुठे करावी याबाबत त्यांना प्रशिक्षण दिले. त्यानुसार त्यांना अनेक आयुर्वेदिक उत्पादन करणाऱ्या संस्थांशी जोडून दिले. नामांकित कंपन्यांना अनेक औषधी वनस्पती सुनील पुरवतो. यासाठी त्याने आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 6 केंद्र सुरू केली असून, त्यात आदिवासी काम करतात.

ज्या आदिवासी नागरिकांना रोज 100 रुपये मिळायचे ते आज यात काम करून 300 ते 400 रुपये रोज मिळवतात, अशी माहिती विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागीय केंद्राचे संचालक डॉ. दिगंबर मोकाट यांनी दिली.

औषधी वनस्पतीची शेती ही काळाची गरज आहे. अनेक लोक ही शेती करतात. मात्र, योग्य मार्गदर्शन मिळाले तर व्यक्‍ती कुठे पोहोचू शकतो हे या उदाहरणावरून स्पष्ट होते. विद्यापीठात या औषधी वनस्पतीबाबत मोठ्या प्रमाणात काम सुरू असून, समाजाला याचा उपयोग होतो आहे.
– प्रा.डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.