महापालिकेकडून गुपचूप तपासणी
पुणे – महापालिकेकडून शहरात भाडेकराराने देण्यात आलेल्या वाहनतळांमध्ये नियमानुसार शुल्क आकारले जाते किंवा नाही, याची तपासणी मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून सुरू केली आहे. पालिकेचे कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे या वाहनतळांना भेटी देत असून त्या ठिकाणी आकारले जाणारे शुल्क तसेच पालिकेने घालून दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन होते की नाही याची तपासणी करत आहेत. गेल्या आठवड्याभरापासून ही तपासणी सुरू असून पुढील आठवड्यात त्याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
शहरातील खासगी वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्यावरील पार्किंगची स्थिती गंभीर होत आहे. महापालिकेकडून शहरात सुमारे 30 ते 32 वाहनतळ विकसित केली असून ही चालविण्यासाठी भाडेकराराने देण्यात आली आहेत. वाहनतळांसाठी ठेकेदाराने किती शुल्क आकारावे हे महापालिकेने निश्चित करून दिले आहे. नागरिकांचा विचार करून हे शुल्क 2 रुपयांपासून जास्तीत जास्त 5 रुपयांपर्यंत आकारण्यास मान्यता दिली आहे.
मात्र, असे असतानाही, बहुतांश पार्किंगच्या ठिकाणी 10 ते 20 रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येते. ही बाब बेकायदेशीर असल्याने शहरातील नागरिकांकडून महापालिकेकडे पुराव्यांसह तक्रार करण्यात येत आहे. त्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाकडून गांभीर्याने घेत, सर्व पार्किंगची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ही तपासणी सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
…तर ठेका होणार रद्द
नागरिकांकडून पार्किंगसाठी आकारण्यात येणाऱ्या जादा शुल्काबाबत महापालिकेकडे केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वीच औंध येथील एक पार्किंगचा ठेका महापालिकेने रद्द केला आहे. याच कारवाईच्या अनुषंगाने या तपासणी मोहिमेत महापालिकेने या पूर्वी जादा शुल्काबाबत कारवाईची नोटीस दिलेल्या ठिकाणी जादा शुल्क आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा ठिकाणचा ठेका रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.