कात्रज – सोमवार…वेळ दुपारची.., क्षेत्रीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजात सर्व कर्मचारी व्यस्त… तेवढ्यात राज्याच्या आरोग्य मंत्र्यांची गाडी ताफ्यासह क्षेत्रीय कार्यालयात येऊन थांबते…कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू होते. आरोग्य विषयक काहीतरी कार्यक्रमासंदर्भात मंत्री आले असतील, असे वाटत असताना ते थेट अतिक्रमण नियंत्रण विभागात जातात तेथे गोंधळ सुरू झाल्याने सर्व कर्मचारी तसेच नागरिकही त्या विभागाकडे धाव घेतात…तेथे आरोग्य मंत्र्यांचे संतापलेले रुप पाहायला मिळते…आणि जोरात चर्चा सुरू होते…
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत संभाजीनगर फूटपाथ येथे कारवाई करून अतिक्रमण नियंत्रण विभागाने काही हातगाड्या तसेच वाहने जप्त केली. त्यात जप्त केलेली एक विनापरवाना हातगाडी आणि जो टेम्पो आणला आहे, तो तत्काळ सोडून द्या…असा थेट तोंडी आदेशच आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला. मात्र, कारवाई कायदेशीर असून दंड भरल्याशिवाय वाहने सोडता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी थेट महापालिकेत फोन लावून वरिष्ठांशी वाद घालत.., अतिक्रमण निरीक्षकांनाच निलंबित करा.., असे सांगितले. मात्र, सदर कारवाई कोणत्या आधारावर करण्यात आली याची तपासणी करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे वरिष्ठांकडून स्पष्ट करण्यात आले. हा सर्व प्रकार सुरू असताना धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त किशोरी शिंदे या तेथेच उपस्थित होत्या. “नागरिकांना त्रास होत असून वाहतूक कोंडी देखील होते. यावर नियंत्रणासाठी विनापरवाना हातगाड्यांवर दैनंदिन कारवाई होत आहे. जो दंड असेल तो भरून वाहने परत देण्यात येतील,’ असे किशोरी शिंदे यांनी स्पष्ट केले. अधिकारी नियमाबाहेर जात नसल्याचे पाहून हतबल झालेले आरोग्यमंत्री अखेर हाताची घडी घालत मोकळ्या हाताने क्षेत्रीय कार्यालयाबाहेर पडले.
आत्तापर्यंत कोणतेही नगरसेवकदेखील अशाविषयी क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलेले नाहीत. मात्र, आज महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी एक अनधिकृत विनापरवाना हातगाडी सोडविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय येऊन जाब विचारणे, हे कोणत्याच नियमाला धरून नाही.
– किशोरी शिंदे, सहायक आयुक्त, धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय
“तुम्ही तुमचे खाते सांभाळा, आम्ही अधिकाऱ्यांसोबत ठाम उभे आहोत…’
आरोग्यविषयक अनेक प्रश्न महाराष्ट्राला भेडसावत असताना क्षेत्रीय कार्यालयाच्या कारवाईतील विनापरवाना हातगाडी आणि टेम्पो सोडविण्यासारख्या क्षुल्लक कारणासाठी आणि तेही अनधिकृत व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी, आरोग्यमंत्र्यांनी यावे. शासकीय कामात अडथळा आणावा, याबाबत क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे ठाम उभे राहू, राजकीय दबावातून कारवाई होत असेल तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारू, असेही प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांनी सांगितले.