पुणे – आता नव्या नियमानुसार बांधणार स्पीडब्रेकर

वाहतूक पोलीस, स्वयंसेवी संस्थांबरोबर बैठकीत होणार निर्णय

पुणे – आता नव्या नियमानुसार स्पीडब्रेकर बांधणार असून, त्यासंदर्भात वाहतूक पोलीस आणि स्वयंसेवी संस्था यांच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी गतीरोधक समितीच्या बैठकीत ही नियमावली मांडण्यात आली असून, त्याला समितीचा “ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.

रस्त्यांवर असलेले स्पीडब्रेकर म्हणजे एखादा डोंगर चढल्याचा प्रकार असतो, किंवा एखादा स्पीडब्रेकर हा अक्षरश: मणक्‍यात कळ आणणारा असतो. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कमी परंतु त्यांच्या आरोग्याला अहितकारकच जास्त असे त्याचे परिणाम दिसून येत होते.

मात्र, “इंडियन रोड कॉंग्रेस’ (आयआरसी)च्या नियमानुसार आता हे स्पीडब्रेकर बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी पूर्वी बनवलेल्या नियमावलीत “आयआरसी’ने बदल केले असून, त्याचा समावेश करून महापालिकेने एक नियमावली बनवून ती गतीरोधक समितीपुढे मांडली. समितीने त्या नियमावलीवर विचार करून त्याला मंजुरी दिली आहे.

नियमावलीत करण्यात आलेल्या सूचना
– नियमावलीमध्ये “साईनबोर्ड’चा वापर करण्यासंबंधीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये स्पीडब्रेकर केलेल्या जागेच्या आधी 40 मी अंतरावर 60 सेमी आकाराचे स्पीड ब्रेकर असल्याची माहिती देणारे फलक लावणे आवश्‍यक आहे, असे नमूद केले आहे.
– गतीरोधकाच्या आधी पाच मीटरवर थर्मोप्लॅस्ट पेंटने रॅम्बलर स्ट्रीप करणे आवश्‍यक आहे. तसेच, गतीरोधक “आयआरसी’ने दिलेल्या नियमानुसारच रंगवणे आवश्‍यक आहे.
– प्रत्येक चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंग हे गुणवत्तापूर्वक पेंटने रंगवणे बंधनकारक आहे. तसेच, प्रत्येक गतीरोधकाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाशयोजना असणे आवश्‍यक आहे.
– रस्त्याची संपूर्ण रुंदीभर रम्ब्लर स्ट्रीपचे सुरुवातीला कॅट्‌स आय (पिवळ्या रंगाचे) लावणे आवश्‍यक आहे. रस्त्यावरील वाहने गतीरोधकावरून पदपथांवर जाऊ नये यासाठी पदपथांच्या कडेने आणि स्पीडब्रेकरच्या बाजूला प्लास्टिकचे बोलार्डस लावण्यात यावेत.
– गतीरोधकाच्या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पाण्याचा निचरा होणे आवश्‍यक आहे. त्याची उपययोजना करावी.
– गतीरोधक हे थर्मोप्लॉस्टिक पेंट जागेवरील परिस्थितीनुसार नियमित रंगवले जावेत. असेही या नियमांमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही नियमावली मुख्यसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.