कात्रज – कात्रज चौकातील सुरू असलेला १,१०० मीटर उड्डाणपूल पुढे गोकुळनगरपर्यंत १३०० मीटर वाढवण्यसाठी १०० कोटी रुपये निधीची गरज आहे. तसेच कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी जागा मालकांना योग्य मोबदला देऊन भूसंपादन व अन्य कामाला गती देण्याच्या सूचना पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पालिका प्रशासनाला केल्या.
हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे व माजी नगरसेवक प्रकाश कदम यांच्या मागणी वरून अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसह कात्रज चौकातील उड्डाणपूल व कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण कामाची पाहणी केली.
यावेळी पवार म्हणाले की, कात्रज-कोंढवा रस्त्यावर जड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होते. पुढील पन्नास वर्षाचा विचार करून नियोजन करावे लागेल. भुसंपादनासाठी बधे, धारिवाल या जागा मालक सहकार्य केले. तसेच इतरांनीदेखील करावे. मनपा योग्य मोबदला देईन. भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून २०० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव पालिकेने पाठवला आहे. कॅबिनेट मान्यतेसाठी येईल, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मार्गी लावू असे सांगितले.
यावेळी आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम, कार्यकारी अभियंत्या श्रुती नाईक, सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे, उपअभियंता धनंजय गायकवाड, उदयसिंह मुळीक, संदीप बधे आदींसह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.