लक्ष्मी रस्त्यावरील वास्तूचा 90 वर्षांचा इतिहास
पुणे – पूना गेस्ट हाऊसचे विशेष टपाल तिकिट डाक विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आले असून त्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले. यामध्ये पूना गेस्ट हाऊसचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
टपाल विभागातर्फे बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील कलादालनात दोन दिवसीय पुणेपेक्स प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत आज (दि. 7) पूना गेस्ट हाऊसचे छायाचित्र असलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण करण्यात आले. या वेळी पूना गेस्ट हाऊसचे संचालक अभय आणि किशोर सरपोतदार तसेच साधना आणि शर्मिला सरपोतदार उपस्थित होते.
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर पूना गेस्ट हाऊसची वास्तू गेल्या 90 वर्षांपासून दिमाखात उभी असून हिंदी-मराठी चित्रपट तसेच नाट्य क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ यांसह लाखो पुणेकरांनी पूना गेस्ट हाऊसमधील मराठमोळ्या आणि लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. पूना गेस्ट हाऊसची स्थापना १९३५ मध्ये मूकपटाचे आद्यनिर्माते, दिग्दर्शक, लेखक कै. नानासाहेब सरपोतदार यांनी केली. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी कै. सरस्वतीबाई आणि त्यांचे पुत्र निर्माते कै. चारुदत्त यांनी पूना गेस्ट हाऊसची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
इंटरनॅशल कलेक्टर ऑफ रेअर सोसायटीचे बहुमोल सहकार्य या कामी लाभले आहे. टपाल विभाग आणि इंटनॅशनल कलेक्टर ऑफ रेअर सोसायटी यांचे कार्य रत्नपारख्याचे आहे. पूना गेस्ट हाऊसला मिळालेला बहुमान आमची जबाबदारी वाढविणारा आणि प्रोत्साहन देणारा आहे, अशी प्रतिक्रिया किशोर सरपोतदार यांनी दिली आहे.