पुणे – दुसऱ्या लॉकडाऊननंतर शहरातील बहुतांश व्यवहार खुले झाले. मात्र, साऊंड व्यवसायावरील निर्बंध अजूनही कायम आहेत. त्यामुळे “आऊटडोअर’ कार्यक्रमांना साऊंड सिस्टीम वापरण्यास आणि त्याबाबतचे निर्बंध शिथिल होण्याची अद्यापही व्यावसायिकांना प्रतीक्षाच आहे.
लहान-मोठ्या कार्यक्रमांना हमखास साऊंड सिस्टीमचा वापर केला जातो. मात्र, लॉकडाऊनपासून त्यावर निर्बंध लागू केल्याने व्यवसाय कोलमडला आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुका, जाहीर सभा, मिरवणुका आदी खुली पटांगणे, मैदाने, रस्त्यावर होणाऱ्या कार्यक्रमांवर अनेक भागांत अद्यापही निर्बंध कायम आहे. याचा फटका साऊंड सिस्टीम व्यावसायिकांना बसत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बसलेला कोट्यवधी रुपयांचा फटका आणि निर्बंधांमुळे व्यावसायिक हतबल झाले आहेत. यासह साऊंड यंत्रणांसाठी होणारा खर्च आणि देखभालीसाठीचा खर्च देखील व्यावसायिकांना करावा लागतो.
लॉकडाऊनमध्ये पहिला फटका साऊंड व्यवसायाला बसला. या क्षेत्रातील अनेकांनी आत्महत्यादेखील केल्या. असोसिएशनने या दरम्यान अनेक व्यावसायिकांना मदत केली. अनलॉकमध्ये सर्वात शेवटी मनोरंजन क्षेत्र सुरू झाले. मध्यंतरी लग्न, समारंभांना देखील बंधने होती. त्यामुळे शंभर-दोनशे जणांसाठी कोणी साऊंड सिस्टीमचा वापरत नव्हते. याशिवाय प्रशासकीय देखील निर्बंध होते. असोसिएशनने निर्णय घेत, पोलीस प्रशासन आणि स्थानिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आहे, असे सुतार यांनी सांगितले.
शहरात दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान होणारी उलाढाल मोठी असते. लाइट, साऊंडमध्ये सातत्याने नवीन गोष्टी होत असतात. त्या “अपडेट’ करण्यासाठी देखील खर्च येतो. शासनाला देखील निवेदने दिली आहेत, त्यांच्याकडून सकारात्मक भूमिकेची अपेक्षा होती. 20-30 वर्षांपासून या क्षेत्रात असणाऱ्या व्यक्ती अन्य कोणत्याही ठिकाणी कामे करू शकत नाहीत. त्यामुळे रोजगाराचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
– सिद्धार्थ सुतार, व्यावसायिक
हजारो व्यावसायिकांवर आर्थिक संकट
साऊंड, लाईट या क्षेत्रातील शहरातील व्यावसायिकांची सुमारे 30 हजारांहून अधिक आहे. तर व्यावसायिकांकडील टेक्निशिअन, कामगार वर्ग आणि त्यांच्या परिवार संख्या देखील मोठी असून, सुमारे लाखो जणांना याचा परिणाम सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान काही व्यावसायिकांनी आत्महत्येचे पाऊल उचलले होते. व्यावसायिकांकडील अनेक कामगार परराज्यांतून स्थलांतरित होऊन पुण्यात येतात. व्यावसायिकांनी सुरूवातीच्या काळात कामगारांना पगार दिले.
मात्र व्यवसाय पूर्वपदावर न आल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे. यातच साऊंड, स्पीकर्स आणि त्याअनुषंगाने आवश्यक असणारे साहित्य ठेवण्याच्या जागेचे भाडे, साऊंडची देखभाल, यंत्रणा आणि तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी येणारा खर्च आदीची मुलभूत खर्चांची यादी देखील मोठी आहे. ही यंत्रणा खरेदी करण्यासाठी अनेकांनी कर्ज घेतले असून, त्या हप्त्यांची प्राधान्याने तरतूद करावी लागत असल्याचे व्यावसायिक सांगतात.