पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी जिल्हा न्यायालयाच्या आवारातील 1 हजार 150 चौ. मी. जागेची आवश्यकता होती. ही जागा प्राधिकरणास मिळाल्याने याठिकाणी मेट्रोचे स्टेशनसाठी जिना उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्राधिकरणाने माण- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइन-3 हा प्रकल्प हाती घेतला आहे. राज्य शासनाने 2018 मध्येच हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. हा मार्ग सुमारे 23 कि.मी लांबीचा असून या मार्गावर 23 स्टेशन असणार आहे.
मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीबरोबर केलेल्या करारनाम्यानुसार प्राधिकरणावर मेट्रो प्रकल्पासाठी 100 टक्के जमीन भूसंपादन करून ताब्यात देण्याची व विविध परवानग्या प्राप्त करण्याची जबाबदारी आहे.
मेट्रो प्रकल्पाच्या कार डेपो, कास्टिंग यार्ड, व मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या एकूण जागेपैकी 99.75 टक्के जमीन कंपनीस यापूर्वीच हस्तांतरित करण्यात आली आहे. मेट्रोचे शेवटचे स्टेशन हे शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात असणार आहे. या स्टेशनसाठी जिन्यासाठी आवश्यक असलेली ११५०.६६ चौ. मी. जागा प्राधिकरणास हस्तांतर करण्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबई यांची बिल्डिंग कमिटी यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा न्यायालय व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांच्यादरम्यान नुकताच करारनामा स्वाक्षांकित करण्यात आला, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली.