पुणे- दरवर्षी असणारी भाविकांची मांदियाळी… कार्यकर्त्यांचा ओसंडून जाणारा उत्साह, नेत्रदीपक रोषणाई या साऱ्याला करोनामुळे दूर ठेवत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने साधेपणानेच “श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. मोठा उत्साही माहोल ठेवला नसला, तरी कार्यकर्त्यांच्या मनात असणारा भक्तीचा वसा त्यांच्या उपस्थितीतून आणि वर्तनातून सहज दिसत होता.
करोनामुळे साधेपणानेच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. सरकारच्या आवाहनाला सामाजिक दृष्टीकोन बाळगत साथ देण्याचा निर्णय ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या मुहुर्तावर मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते ट्रस्टच्या श्रींची प्रतिष्ठापना झाली. नेत्रदीपक उत्सव मंडपात “श्रीं’ची मूर्ती विराजमान झाली असून, भक्तीमय वातावरणात गणेशोत्सवाचा प्रारंभ झाला.
यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, सचिव दिलीप आडकर, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, विश्वस्त मिलिंद सातव, सुरज रेणुसे, विनोद नाईक, परेश खांडके, गणेश उरूनकर, प्रतिक जावळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्सव साधेपणाने साजरा होत असला, तरी देखील उत्साहाचे वातावरण होते. सामाजिक भान ठेवत कार्यकर्त्यांनी आपल्या उत्साहावर नियंत्रण ठेवले. या नेत्रदीपक सोहळ्यातही त्यांच्याकडून करोना प्रतिबंधक मास्क, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे स्वयंस्फूर्तीने पालन केले. मंदिरात बालन यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
परंपरेनुसार मूर्ती उत्सवमंडपात दाखल झाली. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात ढोल-ताशांचे वादनदेखील करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत आहोत. यावर्षी देखील ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून, दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नागरिकांनी देखील ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घ्यावा.
– पुनीत बालन, उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट