पुणे – करोनामुळे निर्बंधात असलेले शिवाजीनगर न्यायालय मार्चनंतर सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सकाळी पक्षकारांनी न्यायालय आणि न्यायालयाच्या बाहेर गर्दी केली. सामाजिक अंतराच्या नियमाला हरताळ फासताना नागरिक दिसून आले. मात्र, ही गर्दी सकाळच्या सत्रातच होती. त्यानंतर गर्दी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. तरीही वकील, पक्षकारांकडून करोनाच्या परिस्थितीत मास्क वापरण्यात येत होता.
करोना संसर्गामुळे जाहीर करण्यात आलेला पहिला लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जिल्हा न्यायालयासह इतर न्यायालयांत काही अपवाद वगळता केवळ तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांवरच सुनावणी सुरू होती. त्यामुळे न्यायालयात असलेली गर्दी ही मर्यादीत होती. मात्र, मंगळवारी (दि. 7) सर्वच प्रकारच्या दाव्यांवर सुनावणी सुरू करण्यात आली आहे. परिणामी, वकील आणि पक्षकारांमध्ये उत्साह दिसून आला आहे. तारीख असलेल्या दाव्यांतील दोन्ही बाजूंचे पक्षकार आणि वकील न्यायालयात हजर झाले होते. त्यासह इतर न्यायालयीन कामांसाठी न्यायालयात आलेल्या वकील व पक्षकारांची संख्या मोठी होती. जिल्हा न्यायालयात मंगळवारी मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.
न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासून अगदी कोर्ट हॉलपर्यंत वकील, पक्षकारांची गर्दी झाल्याचे पहायला मिळाली. पूर्वी वॉरंट निघत नव्हते. आता वॉरंट निघू शकते, त्यामुळे दाव्याची स्थिती पाहण्याच्या हेतूने काही आले होते. तर, करोनामुळे तारीख मिळत नव्हती. आता किती तारीख आहे. दाव्याची परिस्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी अनेकजण आले होते. रेंगाळलेल्या ऑर्डर लवकर होतील, अशी अनेक पक्षकारांना अपेक्षा आहे.
करोना परिस्थितीतील निर्बंध हटविल्यानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी न्यायालयात पक्षकारांनी गर्दी केली होती. करोना अजून पूर्णपणे गेलेला नाही. पक्षकरांनी गर्दी करू नये. गरज असेल तरच न्यायालयात यावे. काम झाल्यानंतर लगेच निघून जावे. करोना परिस्थितीत सर्व नियमांचे पालन करावे.
– ऍड. सचिन हिंगणेकर,
उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन