अभी भालेकर
टाकळी ढोकेश्वर – पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्ठीमुळे ढवळपुरी, वनकुटे, पळशी, खडकवाडीसह अनेक भागात मोठे नुकसान झाले असून दोन पुल वाहून गेले तर अनेक घरांची पडझड झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पारनेर तालुक्यातील खडकवाडी, पळशी, वनकुटे, ढवळपुरी, वडगाव सावताळ, कामटवाडी, मांडवे, पोखरी, पळसपूर, म्हसोबाझापसह अनेक गावात सोमवारी रात्री 9 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. अनेक घरांसह, पीकांचे मोठे नुकसान झाले. ढवळपुरी ते वनकुटे ते पळशी दरम्यान असणारे दोन पुल वाहून गेल्याने या भागातील जनतेचा संपर्क तुटला आहे. ढवळपुरी ते वनकुटे व पळशी ते वनकुटे हे रस्ते पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झाले.या रस्त्यावरील बांधलेले पुल पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे वाहून गेले. त्यामुळे दळणवळणाची सुविधा कोलमडली.
गेल्या तीन चार दिवसांपासून या भागात भिजपाऊस झाल्याने व सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामध्ये अनेक जुने घरे पडली. तर अनेक ठिकाणी बाजरीची काढणी चालू असून शेतामध्ये काटलेली बाजरीची कणसे या पाण्यात पोहत असल्यामुळे बाजरीसह इतर मालाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत.
सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी आमदार नीलेश लंके यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.
– ऍड. राहुल झावरे, सरपंच वनकुटे