पुणे – छुप्या पाणीकपातीवर शिक्‍कामोर्तब

पुणे – वाढत्या उन्हाच्या चटक्‍यामुळे शहरातील पाण्याची मागणी 10 ते 15 टक्के वाढली असल्याने, महापालिकेचे पाणी पुरवठ्याचे नियोजन मागील आठवड्यापासून कोलमडले आहे. त्यामुळे शहराच्या उपनगरीय भागातील नागरिकांना पाणी देण्यासाठी महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात दरदिवशी काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेऊन हे पाणी इतर भागांसाठी वळविण्यात येणार आहे.

येत्या दि.10 जूनपासून हे पाणी नियोजन लागू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या जलकेंद्राची क्षमता दररोज सुमारे 250 एमएलडी असून त्यातील 30 एमएलडी पाणी दररोज इतर भागासाठी वळविले जाणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाच्या वाढत्या कडाक्‍यामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या महापालिकेकडून शहरात दररोज 1,350 एमएलडी पाणी पुरवठा केला जात असला, तरी प्रत्यक्ष मागणी 1,450 ते 1,480 एमएलडीची आहे.

त्यामुळे या मागणी एवढा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून गेल्या दोन आठवड्यापासून शहरात
10 ते 15 टक्के छुपी पाणी कपात करण्यात येत आहे. परिणामी, शहरात जलवाहीनीचा शेवटचा भाग असलेल्या परिसरातील नागरिकांना दोन ते तीन दिवस पाणीच मिळत नसून हे नागरिक संतप्त झाले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.