मंचर – ऐन दिवाळीत मंचर (ता. आंबेगाव) येथील बस स्थानकावरून वेळेत बस मिळत नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून खासगी वाहनचालक हे प्रवाशांची लूट करत आहे. दोन दिवसांपूर्वी मंचर एसटी आगार सुरू झाले असले तरी पूर्णपणे एसटीची सुविधा सुरू न झाल्याने प्रवासी वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दिवाळीच्या सुट्टी असल्याने पुणे, मुंबई शहरातील नागरिक गावाकडे तर गावाकडील महिला वर्ग मुलांना घेऊन सुट्टीसाठी माहेरी जात असतात. यासाठी खासकरून एसटीचा वापर केला जातो; मात्र दिवाळी सुरू असतानाच मंचर बस स्थानकावर बाहेरगावी जाण्यासाठी बस उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. नारायणगाव, राजगुरूनगर एसटी आगाराने अनेक एसटी बसेस बंद असल्याने बसेसची गैरसोय झाली आहे. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर लांबपल्ल्याच्या बसेस या पुणे येथून गच्च प्रवाशांनी भरून येत असल्याने त्या मंचर बस स्थानकावर न थांबता सरळ पुढे निघून जातात,
त्यामुळे प्रवाशांना एसटी बस मिळत नसल्याने पर्यायी मार्ग म्हणून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. खासगी वाहनचालक एसटी बसच्या तिकिटापेक्षा दुप्पट पैसे आकारत आहेत. नारायणगाव आगाराची रामवाडी, लाखणगाव एसटी बस, राजगुरूनगर आगाराची लाखणगाव, नारोडी या मुक्कामी असणाऱ्या बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच पुणे येथून भीमाशंकर येथे जाणारी बस ही पुणे येथूनच पूर्णपणे प्रवाशांनी भरून येत असल्याने मंचर, घोडेगाव बस स्थानकावरील प्रवाशांना एसटी बसमध्ये जागा मिळत नसल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
मंचर एसटी आगार सुरू होऊन तीन दिवस झाले आहेत. राजगुरूनगर आणि नारायणगाव एसटी आगारातून मंचर एसटी आगारासाठी पुरेशा बस उपलब्ध झाल्या नाही. गुरुवार (दि. 16) पर्यंत सर्व एसटी बसेस उपलब्ध होणार आहे. त्या माध्यमातून 100 टक्के प्रवासी वाहतूक होईल, तोपर्यंत प्रवाशांनी सहकार्य करावे.
– बालाजी सूर्यवंशी, आगार प्रमुख, मंचर